फोडाफोडीवरून शिंदे गट-भाजपात खडाखडी, चार महिन्यांपूर्वी भाजपमध्ये आलेले माजी नगरसेवक अरुण गीध शिंदे गटात दाखल

भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’मुळे भेदरलेल्या शिंदे गटाने थयथयाट करत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केली होती. यानंतर हिवाळी अधिवेशनात शिंदे आणि चव्हाण यांची बैठक होऊन एकमेकांचे पदाधिकारी न फोडण्याबाबत समझोताही झाला होता. मात्र आठ दिवसांतच हा समझोता म्हणजे फुसका बार ठरला आहे. कल्याणमधील माजी नगरसेवक अरुण गीध आणि माजी नगरसेविका वंदना गीध यांनी भाजपला सोडचिट्ठी देऊन शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे एकमेकांचे पदाधिकारी फोडाफोडीवरून शिंदे गट-भाजपात पुन्हा एकदा खडाखडी सुरू झाली आहे.

सोमवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अरुण गीध आणि वंदना गीध यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या पक्षप्रवेशाची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सोशल मीडिया माध्यमातून दिली. या प्रवेशानंतर भाजपकडून तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली. शिंदे गटाचे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर येथील अनेक आजी माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. शिवसेनेकडून जर अशा प्रकारे पाठीत खंजीर खुपसण्याचे काम सुरू राहिले तर आम्हालाही आमची भूमिका बदलावी लागेल, असा इशारा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिला.

फोडाफोडीची सुरुवात उल्हासनगरातून झाली होती. शिंदे गटाने भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना आपल्या गटात प्रवेश दिल्याने भाजपला धक्का बसला होता. यानंतर रवींद्र चव्हाण यांनी ‘ऑपरेशन लोटस’ राबवत शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकाना भाजपमध्ये घेतले.