
पक्ष फोडाफोडीच्या मार्गाने महाराष्ट्रातील महायुतीतून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार गटाला ऐन महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर जबर धक्के बसत आहेत. पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार याचे नाव येत असताना आता क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात नाशिक जिल्हा न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. आधीच कृषीमंत्री असताना वादग्रस्त राहिलेले माणिकराव यांच्याकडून ते खाते काढून क्रीडामंत्री बनवण्यात आले. मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर माणिकराव कोकाटेंची खूर्ची संकटात आली आहे. इकडे ही घडामोड सुरू असताना अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे हे दिल्लीत जाऊन पोहचले आहेत.
धनंजय मुंडे दिल्लीत असल्याची माहिती खुद्द अजित पवार गटाच्या नेत्यांना देखील नव्हती. धनंजय मुंडे हे केवळ दिल्लीत होते असे नाही तर त्यांनी थेट अमित शहांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अजित पवार गटासह महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आले आहे.
धनंजय मुंडे भाजपमध्ये प्रवेश करणार? माणिकराव कोकाटेंचे मंत्रिपत गेल्यास पुन्हा मंत्रिपद मिळवण्यासाठी मुंडे उत्सुक? अशा विविध चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर अजित पवार गटाचे दिल्लीतील नेतेही चांगलेच हैराण झाले आहेत.


























































