पाण्याच्या एका-एका थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; हिंदुस्थाननंतर अफगाणिस्ताननं घेतला मोठा निर्णय

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने कठोर निर्णय घेत सिंधू जल करार रद्द करत पाकिस्तानचे पाणी अडवले. आता हिंदुस्थानंतर अफगाणिस्ताननेही पाणी रोखण्याची तयारी सुरू केली आहे. अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार कुनार नदीचा प्रवाह वळवण्याची योजना आखत आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

कुनार नदीचा प्रवाह अफगाणिस्तानच्या नांगरहार भागाकडे वळवण्याची योजना अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आखली आहे. या संदर्भात तालिबान सरकार आणि अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठकही झाली असून लवकरच या योजनेवर मोहोर उमटवण्याची शक्यता आहे.

तालिबान सरकारच्या आर्थिक आयोगाच्या तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये एक प्रस्ताव मंजूर झाला आहे. कुनार नदीचे पाणी नांगरहारमधील दारुंता धरणाकडे वळवण्याची तालिबान सरकारची योजना आहे. हा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी आर्थिक आयोगाकडे पाठवण्यात आला आहे.

हा प्रस्ताव मंजूर झाल्यास अफगाणिस्तानमधील नांगरहार भागातील पाण्याची समस्या दूर होईल आणि मोठ्या प्रमाणात शेती ओलिताखाली येईल. मात्र याचा मोठा फटका पाकिस्तानला बसेल, पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा भागामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होईल. ‘अफगाणिस्तान टाइम्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, कुनार नदी 500 किलोमीटर लांबीची आहे. ही नदी हिंदूकुश पर्वतरांगातून उगम पावते आणि अफगाणिस्तानमधील कुनार, नांगरहार प्रांतातून वाहत पुन्हा पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. यानंतर ही नदी काबुलमधील नदीला जाऊन मिळते. तिथेच पेच नदीचा प्रवाहही येऊन मिळतो आणि त्यानंतर हे पाणी पाकिस्तानमध्ये पोहोचले. येथे पंजाबमधील अटॉक शहरातील सिंधू नदीला मिळते.