
जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि अनेकदा गरजेपेक्षा जास्त सामान घेऊन जात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आता रेल्वेतही विमानाचे नियम लागू करण्यात आले आहेत. प्रवाशांनी आता त्यांच्या रेल्वे प्रवासादरम्यान निर्धारित सामान मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन गेल्यास त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
रेल्वे प्रवासासाठी सामानाच्या मर्यादेबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, प्रवाशांना त्यांच्या वर्गानुसार आधीच मोफत सामान घेऊन प्रवास करण्याची मर्यादा निश्चित आहे आणि जर त्यांनी त्यापेक्षा जास्त सामान वाहून नेले तर त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागते.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानत मोफत सामानाची मर्यादा विमान कंपनी आणि उड्डाण मार्गानुसार बदलते. देशांतर्गत उड्डाणांमध्ये सामान्यतः १५ किलो पर्यंत चेक-इन केलेले सामान आणि ७ किलो वजनाची हँडबॅग ठेवण्याची परवानगी असते. तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये २३ ते २५ किलो किंवा दोन बॅगा (प्रत्येकी २३ किलो वजनाच्या) नेण्याची परवानगी असते. रेल्वे नियमांनुसार, प्रत्येक प्रवाशाला त्यांच्या प्रवासाच्या वर्गानुसार विशिष्ट वजनापर्यंत मोफत सामान ठेवण्याची परवानगी असते. शिवाय कमाल मर्यादा आहे, ज्यामध्ये जादा शुल्क आकारून सामानाची परवानगी आहे. मात्र यापेक्षा जास्त सामान नेणे हे नियमांचे उल्लंघन मानले जाते.
मोफत मर्यादा: प्रथम श्रेणी वातानुकूलितमध्ये (1st AC) ७० किलोपर्यंत मोफत.
जास्त वजन: ७० किलोपेक्षा जास्त वजन असल्यास शुल्क आकारले जाईल, जे पार्सल ऑफिसमध्ये बुक करावे लागेल.
इतर वर्ग: द्वितीय श्रेणी वातानुकूलितमध्ये (2nd AC) ५० किलो, तृतीय श्रेणी वातानुकूलित/स्लीपरमध्ये ४० किलो आणि सामान्य वर्गात ३५ किलो ही मर्यादा आहे.


























































