
कृषि विभागाकडून जाहीर झालेल्या योजना राबविण्याबाबत अधिकारी आणि कर्मचारी वर्ग किती उदासीन आहे हे संगमेश्वर तालुक्यात दिसून आले आहे. खोदून पूर्ण झालेल्या शेततळ्याच्या अनुदानासाठी लाभार्थी महिलेची गेल्या आठ महिन्यांपासून वणवण सुरू आहे.
कृषि विभागाकडून सिंचनासाठी शेततळे ही योजना राज्यभर राबविली जात असते. या योजनेअंतर्गत कनकाडी (ता. संगमेश्वर) येथील ज्योति अरविंद गडवी यांनी २०२४च्या प्रारंभी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केला होता. हा अर्ज मंजुरीपासून ज्योति गडवी यांना कृषी विभागाच्या अनास्थेचा आणि ढिसाळ कारभाराचा अनुभव येण्यास सुरुवात झाली. हा अर्ज मंजूर व्हावा यासाठी त्यांनी देवरुख तालुका कृषि कार्यालयात सातत्याने पाठपुरावा सुरू केला. प्रत्येक वेळी संपर्क साधल्यावर एक दोन कागदपत्रांची कमतरता दाखवत अर्ज मंजूर करण्यास खात्याने दिरंगाई केली. यात पावसाळा सुरू झाल्याने २०२४ साली गडवी यांना शेततळे खोदून घेता आले नाही. त्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबर पासून पुन्हा गडवी यांनी तालुका कृषि खात्याकडे आणि गावात कार्यरत कृषि सहाय्यक कर्मचार्यांकडे शेततळे मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू केला. त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी एप्रिल महिन्यात ज्योति गडवी यांचे शेततळे मंजूर करण्यात आले.
साधारण ३४ मीटर लांब, ३४ मीटर रुंद आणि ३ मीटर खोल असे हे शेततळे मंजूर झाल्यावर खोदाईपूर्वी त्याच्या आखणीसाठी कृषि खात्यातील एक अधिकारी प्लॉटवर आले. त्यांनी अजब पद्धतीचे शेततळ्याची आखणी करून दिली. कोणतीही चौरस आकारातील आखणीसाठी त्या चौरसाचा कर्ण काढणे आवश्यक असते. तसे न केल्यास चौरस काटकोनात येत नाही. पण एवढी साधी बाबही आखणीसाठी आलेल्या आधिकार्यांना माहीत नव्हती. त्यांनी कर्णाचे माप न घेताच शेततळ्याची आखणी करून दिली.
शेततळे खोदले जात असताना कृषि अधिकार्यांकडून पाहणी होणे अपेक्षित होते. गडवी या वारंवार कृषि कार्यालयाशी संपर्क ठेऊन होत्या. पण गावाच्या कृषि सहायिका बाई एकदाही काम पहाण्यासाठी आल्या नाहीत. शेततळे खोदले जात असताना दोन मीटर खोलीवर कातळ लागल्याने काम थांबवावे लागले आणि प्रत्यक्षात ३४ मीटर लांब, ३४ मीटर रुंद आणि २ मीटर खोल असे शेततळे त्यात पाणी येण्याच्या आणि बाहेर जाण्याच्या दोन कालव्यांसह खोदून ज्योति गडवी यांनी बांधून पूर्ण केले. तशी माहितीही गडवी यांनी कृषि सहायिका बाईंना आणि आखणी करण्यासाठी आलेल्या कृषि अधिकार्यांना दिली.
तेव्हापासून ज्योति गडवी या खोदून पूर्ण झालेल्या आकाराच्या पटीत अनुदान मंजूर व्हावे ह्यासाठी पाठपुरावा करत आहेत. पण प्रत्येक वेळी त्यांची आश्वासनांवर बोळवण केली जात आहे. कार्यालयाकडे निधी नसल्याचे कारण तालुका कृषि अधिकारी देत आहेत. आठवडा पंधरा दिवसात निधी जमा होईल, तो झाल्यावर अनुदान वर्ग होईल अशी आश्वासने गेले आठ महीने गडवी यांना दिली जात आहेत. नुकताच तालुका कृषि अधिकार्यांशी संपर्क साधला असता अधिवेशनात हा निधी मंजूर झाला असेल, आता तुमचे अनुदान जमा होईल असे सांगण्यात आले आहे.
































































