मराठी नाटकांना ऑनलाईन बुकिंगची संजीवनी

मराठी नाटकांची परंपरा समृद्ध असून प्रेक्षकांचा प्रतिसादही कायमच उत्साहवर्धक राहिला आहे. मात्र काही वर्षांपूर्वीपर्यंत नाटकांची तिकीट विक्री प्रामुख्याने नाटय़गृहांच्या आरक्षण खिडकीपुरतीच मर्यादित होती. आता मात्र ऑनलाईन तिकीट विक्री करणाऱया ऍप्समुळे मराठी नाटय़सृष्टीला एक नवे बळ मिळाले आहे.

‘बुक माय शो’, ‘तिकिटालय’ आणि ‘तिकीट खिडकी’ यांसारख्या ऑनलाईन ऍप्समुळे नाटकांची तिकिटे घरबसल्या सहज आरक्षित करता येऊ लागली आहेत. हमखास तिकीट मिळण्याची सोय, वेळेची बचत आणि जागेची अडचण नसल्यामुळे आता मोठय़ा प्रमाणावर प्रेक्षक ऑनलाईन बुकिंगकडे वळताना दिसत आहेत.  या ऑनलाईन व्यवस्थेमुळे देशविदेशातील मराठी रसिकांना त्यांच्या आवडत्या नाटकांची तिकिटे कुठूनही आरक्षित करता येऊ लागली आहेत. त्यामुळे अनेक नाटके आधीच ‘हाऊसफुल’ होत आहेत. ‘संगीत देवबाभळी’, ‘शिकायला गेलो एक’, ‘आमने सामने’ यांसारखी लोकप्रिय नाटके ‘बुक माय शो’ आणि ‘तिकिटालय’वर प्रचंड गर्दी खेचताना दिसत आहेत. तसेच ‘द फोक आख्यान’सारखा सांगीतिक कार्यक्रम ऑनलाईन तिकीट विक्री सुरू झाल्यानंतर अवघ्या चार तासांत  हाऊसफुल होणे, ही बाब या बदलत्या प्रवृत्तीचे उत्तम उदाहरण आहे. मात्र या बदलाचा एक परिणाम असा आहे की, नाटय़गृहावर प्रत्यक्ष जाऊन आगाऊ तिकिटे काढणाऱया प्रेक्षकांच्या वाटय़ाला आता मर्यादित तिकिटे उपलब्ध होत आहेत. त्यामुळे काही जुने, नियमित प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. असे असले तरी एकूणच या ऑनलाईन व्यवस्थेमुळे नाटय़निर्माते -कलावंत समाधान व्यक्त करत आहेत. आर्थिकदृष्टय़ाही हा व्यवहार फायदेशीर ठरत आहे.