
क्रिकेट, बुद्धिबळप्रमाणेच जगाच्या पाठीवर हिंदुस्थानचे नाव उज्ज्वल करणारे कॅरमपटूही आहेत. फरक इतकाच की, त्यांच्या गळय़ात जगज्जेतेपदाची सुवर्णपदके झळकत असतानाही त्यांच्या वाटय़ाला अद्याप शासनाची पाठ थोपटणारी शाबासकी आलेली नाही. नुकत्याच मालदीव येथे पार पडलेल्या सातव्या जागतिक कॅरम अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी संघाने 7 सुवर्ण, 4 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई करत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. या ऐतिहासिक यशात महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी सिंहाचा वाटा उचलला.
महाराष्ट्राच्या प्रशांत मोरेने 2 सुवर्ण व 1 रौप्य, काजल कुमारीने 2 सुवर्ण व 1 रौप्य, अभिजित त्रिपनकरने 2 सुवर्ण व 1 कांस्य तर माजी जागतिक विजेता संदीप दिवेने 1 सुवर्ण व 1 रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्राच्या मातीत घडलेले हे खेळाडू आज जगज्जेते ठरले आहेत. तरीही त्यांच्या यशाची नोंद राज्य शासनाच्या दप्तरी का होत नाही, हा प्रश्न आता अधिक बोचरा होत चालला आहे.
विशेष बाब म्हणजे, कॅरमच्या खेळाडूंनी जगज्जेते होताच तामीळनाडू सरकारने तत्काळ दखल घेतली. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी जागतिक विजेती एल. कीर्थनाला एक कोटी रुपयांचा, तर एम. काझिमा आणि व्ही. मित्राला प्रत्येकी 50 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर करून त्यांचा सन्मान केला. मग महाराष्ट्राच्या या सुवर्णपदक विजेत्यांसाठी शासनाकडे शब्दही नाहीत का? राज्य पॅरम संघटनेने हाच सवाल उपस्थित केला आहे. क्रिकेट आणि बुद्धिबळच्या जगज्जेत्यांना जसा मानसन्मान आणि रोख पुरस्कार देण्यात आला, तसाच न्याय पॅरमपटूंनाही मिळायला हवा. पदकांची झळाळी फक्त छायाचित्रापुरती न ठेवता शासनाच्या निर्णयातूनही दिसायला हवी. आज गरज आहे ती पॅरम खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याची, त्यांच्या कष्टांना शासनमान्य प्रतिष्ठा देण्याची. अन्यथा ‘जगज्जेते असूनही दुर्लक्षित’ ही ओळख महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासावर कायमची उमटून राहील.
हिंदुस्थानी कॅरमपटूंची जगावर स्ट्राईक
पुरुष एकेरीत प्रशांत मोरेने तिसऱयांदा जागतिक विजेतेपद पटकावत अंतिम फेरीत के. श्रीनिवासवर तीन सेटच्या थरारक लढतीत मात केली. त्याच गटात अभिजित त्रिपनकरने संदीप दिवेला हरवत कांस्य पदक मिळवले. महिला गटात अंतिम सामन्यात काजल कुमारीला एल. कीर्थनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. सांघिक स्पर्धेत मात्र पुरुष व महिला दोन्ही गटांत हिंदुस्थानने सुवर्णपदकांवर नाव कोरले. पुरुष दुहेरीतही अंतिम फेरीत हिंदुस्थानी खेळाडू आमने सामने आले होते. त्यामुळे दोन्ही पदके हिंदुस्थाननेच जिंकली.































































