
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. दलालांना हाताशी धरून कवडीमोलाने या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घातल्या जात आहेत. त्यामुळे आपल्याच गावात आपण उपरे होतो की काय, अशी अवस्था पनवेल, अलिबाग, उरण या भागात झाली आहे. हे संकट आपल्यावरही येऊ नये याकरिता तळावासीयांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तालुक्यातील कलमशेत ग्रामस्थ व मुंबई मंडळाने एकमुखी ठराव करत यापुढे एक इंचही जमीन परप्रांतीय तसेच गावकुसाबाहेरील व्यक्तीस न विकण्याचा निर्धार केला आहे. या ठरावाची प्रत तहसीलदारांना देत कोणतेही दस्त न करण्याची मागणी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडोर, अलिबाग-झाराप कोस्टल रोड तसेच अन्य खासगी प्रकल्पांसाठी रायगड जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जमीन गेल्या काही वर्षांत संपादित करण्यात आली आहे. उरण, पनवेलचे झपाट्याने शहरीकरण झाले असून जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. या दोन तालुक्यांपाठोपाठ कर्जत, खालापूर, पेण, अलि बाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यातही शेकडो एकर जमीन धनदांडग्यांनी विकत घेतली आहे. शहा, श्रीवास्तव, शर्मा, मेहता यांसारख्या श्रीमंतांनी या जमिनी कवडीमोल भावात घेतल्या आहेत.
कोणतेही दस्त न करण्याची तहसीलदारांकडे मागणी
तुटपुंज्या पैशांसाठी भविष्यात जमीन न विकण्याचा निर्धार येथील गावकऱ्यांनी केला आहे. यासाठी नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये असलेल्या चाकरमान्यांना तसेच माहेरवाशिणींना बोलावून खास बैठक घेण्यात आली. यामध्ये एकमुखी ठराव करून त्याची प्रत रायगड जिल्हाधिकारी, तहसीलदार, दुय्यम निबंधक कार्यालय, तळा पोलीस, तलाठी कार्यालय यांना देण्यात आली. यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष महादेव कुंभेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत वतारे, प्रभाकर खांडेकर, सचिव मंगेश शेंपुडे, उपसचिव केशव बाईत, खजिनदार महादेव करण, गाव अध्यक्ष जानू अडखळे, उपाध्यक्ष हिराजी खांडेकर, पांडुरंग किंजळे, भागोजी कुंभेकर आदी उपस्थित होते.
सुरक्षा भिंतींमुळे शेतात जायचे कसे?
धक्कादायक म्हणजे रस्त्यालगत शेती विकत घेतल्यानंतर त्याभोवती तारेचे तसेच पक्के कंपाऊंड टाकून भूमिपुत्रांचीच वाट अडवली जाते. तळा तालुक्यातही कलमशेत गावाबाहेरील व्यक्तींनी जागा घेतल्यानंतर गावकऱ्यांची ‘नाकाबंदी’ केली आहे. सुरक्षा भिंतींमुळे शेतात जायचे कसे, असा प्रश्न येथील अनेक शेतकऱ्यांना पडला आहे. याबाबत विनंती करूनही पायवाट दिली जात नसल्याने शेतकरी व जमीनमालकांमध्ये वाद होत आहेत. त्यामुळे अशा घटना घडू नये याकरिता बाहेरील व्यक्तींना यापुढे जमीन न विकण्याचा निर्धार केला आहे.
परिस्थिती बिकट असताना आपल्या पूर्वजांनी जमिनी राखून ठेवल्या. मात्र हल्ली मुंबईत घर घ्यायचे आहे. मुलांचे ल ग्न यासारख्या कारणांसाठी सर्रासपणे गावच्या जमिनी विकल्या जात आहेत. याला कुठेतरी आळा बसावा यासाठी ग्रामस्थांनी जमीन न विकण्याचा निर्णय घेतला आहे. महादेव कुंभेकर, मुंबई मंडळ अध्यक्ष
ग्रामीण भागात जमिनी बळ बळकावण्यासाठी बिल्डर तसेच धनदांडगे घिरट्या घालत आहेत. जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर हे जागामालक कंपाऊंड घालतात. त्यामुळे भूमिपुत्रांना आपल्या शेतात जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
जानू अडखळे, गाव अध्यक्ष





























































