‘मनरेगा’चे नाव बदलणाऱ्या केंद्र सरकारविरोधात ‘आत्मक्लेश’

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे ‘महात्मा गांधी’ हे नाव बदलण्याचा केंद्र सरकारने प्रस्ताव आणला आहे. बहुमताच्या नावाखाली महात्मा गांधी यांचे नाव पुसण्याचे पाप भाजप सरकारकडून सुरू आहे. या विरोधात ‘आम्ही भारतीय लोक आंदोलना’च्या वतीने आज पापाची तिकटी परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, माजी आमदार ऋतुराज पाटील, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, भारती पोवार, कॉ. रघुनाथ कांबळे, उदय नारकर, चंद्रकांत यादव, बबन रानगे, तौफिक मुलाणी आदी उपस्थित होते.

कोणत्याही मंत्र्यावर कारवाई होणार नाही

राज्य मंत्रिमंडळातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पण त्यांना काहीही होणार नाही, केंद्र सरकार आणि राज्य सरकार पाठीशी आहे. मंत्री शिरसाट असू देत वा कोकाटे, कारवाई होणार नाही. कोणत्याही मंत्र्यावर कारवाई झालेली आम्ही वर्षभर पाहिलेली नाही, असेही सतेज पाटील यांनी सांगितले.

भाजपकडून महात्मा गांधींचे नाव पुसण्याचे पाप – आमदार सतेज पाटील

केंद्र सरकारने अत्यंत दुर्दैवी पाऊल उचलले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने असणाऱया मनरेगा योजनेचे नाव बदलायचे काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून महात्मा गांधी यांची देशभरातील गरिबांसाठीची चिरंतन आठवण होती, तेच पुसण्याचे पाप भाजपने केले आहे. सभागृहातदेखील विरोधी पक्षाच्या सर्व खासदारांनी हे बिल जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे पाठवा, अशी मागणी करूनसुद्धा बहुमताच्या जोरावर या देशात आम्ही काहीही करू शकतो, अशा पद्धतीचे भाजपचे नियोजन असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला.