
संगमनेर तालुक्यात बिबटय़ांचा वाढता वावर नागरिकांसाठी गंभीर धोका ठरत असून, जवळेकडलग आणि मिर्झापूर या दोन्ही भागांतील घटनांनी संपूर्ण तालुका हादरला आहे. एकीकडे जवळेकडलग येथे चिमुकल्याच्या मृत्यूनंतरही एकच बिबटय़ा जेरबंद झाल्याने अजूनही भीती कायम आहे. काल (दि. 16) दुपारी रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान वनकर्मचाऱयाला मदत करणाऱया व्यक्तीवर बिबटय़ाने हल्ला केला. या घटनने जवळेकडलग पुन्हा हादरले असून, वन विभागाची विशेष रेस्क्यू टीम पाच दिवसांपासून जवळय़ात ठाण मांडून बसली आहे. मिर्झापूरमध्ये लावलेल्या पिंजऱयात एकाचवेळी दोन बिबटे जेरबंद झाले आहेत.
चंद्रकांत काळण (वय 66, रा. खंडोबा गल्ली) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. बिबटय़ाने त्यांच्या तोंडाला, हाताला, पाठीला चावा घेतला आहे. तर दुसरीकडे मिर्झापूर येथे एकाच पिंजऱयात दोन बिबटे पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. तरीही तिसऱया बिबटय़ाने गुंगारा देत भक्ष पळविल्याने दहशत कायम आहे.
जवळेकडलग येथे शनिवारी (दि. 13) बिबटय़ाच्या हल्ल्यात सिद्धेश या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. मंगळवारी (दि. 16) दुपारी बिबटय़ाने चंद्रकांत काळण यांच्यावर हल्ला करून जखमी केल्याने पुन्हा जवळे कडलग हादरले. सिद्धेशच्या मृत्यूला पाच दिवस उलटूनही रेस्क्यूमध्ये एक बिबटय़ा पकडला गेल्याने नागरिकांमध्ये आजही बिबटय़ाबाबत दहशत कायम आहे.
दरम्यान, मिर्झापूर परिसरातही वन विभागाने लावलेल्या पिंजऱयात आज (दि. 17) पहाटे एकाचवेळी दोन बिबटे जेरबंद करण्यात यश आले. मात्र, दुसऱया पिंजऱयात ठेवलेले भक्ष एका बिबटय़ाने पळवून नेल्याची घटना घडली. तसेच वलवे वस्तीवर कालवडीवर बिबटय़ाने हल्ला केला. मात्र, गायीने प्रतिकार केल्याने बिबटय़ा पळून गेला. वन विभागाकडे पिंजऱयांची संख्या वाढविण्याची मागणी विनायक वलवे, सागर वलवे, विनायक वलवे यांनी केली आहे.
वन विभागाची टीम ठाण मांडून
वन विभागाची विशेष रेस्क्यू टीम गेल्या पाच दिवसांपासून ठाण मांडून असून, तब्बल 30 ते 35 कर्मचारी या भागात शोधमोहीम राबवत आहेत. वरिष्ठ पातळीवरून बिबटय़ाला शूट करण्याची परवानगी मिळाल्याचे सांगण्यात येत असले, तरी परिस्थितीनुसार बिबटय़ाला पकडणे, भूल देणे किंवा जाळ्यात अडकवण्याचा निर्णय घेतला जाईल, अथवा जागेवर ठार केले जाईल, अशी माहिती वनपरीक्षेत्र भाग 2चे अधिकारी सागर केदार यांनी दिली. मात्र, पिंजरे, जाळ्या आणि मोठे मनुष्यबळ असूनही बिबटय़ा हातावर तुरी देत असल्याचे चित्र आहे. या भागात पाच ते सहा बिबटय़ा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






























































