
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला स्पेनचा युवा टेनिस स्टार कार्लोस अल्काराजने आपल्या दीर्घकालीन प्रशिक्षक जुआन कार्लोस फेरेरो यांच्याशी सुरू असलेली सात वर्षांची यशस्वी भागीदारी संपुष्टात आणली आहे. नव्या वर्षापासून सॅम्युएल लोपेझ अल्काराजचे नवे प्रशिक्षक असतील. 22 वर्षीय अल्काराजने अवघ्या 15व्या वर्षी फेरेरोच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरू केले होते. या कालावधीत अल्काराजने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान गाठत 6 ग्रँडस्लॅम विजेतेपदे आणि 22 आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे किताब पटकावले. फेरेरोच्या मार्गदर्शनाखाली अल्काराजची कारकीर्द झपाटय़ाने उंचावली. बुधवारी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात अल्काराजने सांगितले, ‘आम्ही एकत्र शिखरावर पोहोचलो आहोत. जर आमचे मार्ग वेगळे होणार असतील तर ते याच टप्प्यावर व्हावेत, असे मला वाटते. ज्या ध्येयासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आणि ज्या उंचीवर पोहोचण्याचे स्वप्न पाहिले, तीच योग्य वेळ आहे.






























































