
ग्रासरूट क्रिकेटमध्ये झपाट्याने विस्तार करत असलेल्या इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (आयएसपीएल) ने आपल्या तिसऱ्या हंगामासाठी तब्बल 5.92 कोटी रुपयांचा पारितोषिक निधी जाहीर केला आहे. या घोषणेमुळे उदयोन्मुख खेळाडूंना संधी देण्याची आणि त्यांच्या कामगिरीला भरीव बक्षीस देण्याची आयएसपीएलची कटिबद्धता अधिक ठळक झाली आहे.
आयएसपीएलचा तिसरा हंगाम 9 जानेवारी ते 6 फेब्रुवारी 2026 या कालावधीत सुरत येथील लालभाई कॉन्ट्रक्टर स्टेडियमवर रंगणार आहे. हिंदुस्थानची ही अग्रगण्य टेनिस बॉल टी-10 लीग ग्रासरूट क्रिकेटच्या परिसंस्थेत आमूलाग्र बदल घडवत असून, खेळाडूंचा शोध घेण्याबरोबरच त्यांना सातत्याने गौरवण्यावर भर देत आहे.
या हंगामातील विजेत्या संघाला 2 कोटी रुपये, तर उपविजेत्या संघाला 1 कोटी रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. लीगचा सर्वोत्कृष्ट खेळाडू (एमव्हीपी) म्हणून निवड झालेल्या खेळाडूस आकर्षक पोर्श कार देण्यात येणार असून, हे हिंदुस्थानातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात मौल्यवान वैयक्तिक सन्मानांपैकी एक ठरणार आहे.
संपूर्ण हंगामात 44 सामन्यांमध्ये प्रत्येकी 50 हजार रुपयांचे ‘मॅन ऑफ द मॅच’ पारितोषिक देण्यात येणार असून त्यासाठी एकूण 22 लाख रुपये राखीव आहेत. तसेच प्रत्येक सामन्यात 20 हजार रुपयांचे ‘फॅन ऑफ द मॅच’ पारितोषिक देण्यात येणार असून त्याचा एकूण खर्च 8.8 लाख रुपये आहे. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी 2.5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
आयएसपीएलच्या कोअर कमिटीत सचिन तेंडुलकर, आशीष शेलार, मीनल अमोल काळे आणि सूरज सामत यांचा समावेश असून संधी, समावेशन आणि व्यावसायिक प्रगती या दीर्घकालीन दृष्टिकोनातून ते ग्रासरूट क्रिकेटपटूंना दिशा देत आहेत.






























































