ठाणे पोलीस शाळेला सर्वसाधारण विजेतेपद, मावळी मंडळाच्या आंतरशालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत 800 स्पर्धकांचा सहभाग

श्री मावळी मंडळाने आपल्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या आंतरशालेय अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे पोलीस शाळेने मुलांच्या व मुलींच्या गटात सांघिक विजेतेपदावर आपला ठसा उमटवत सर्वसाधारण विजेतेपदावरही आपलेच नाव कोरले. या स्पर्धेत 40 शाळांमधून सुमारे 800 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेत मुलांच्या गटात सर्वसाधारण विजेतेपद काबीज करताना ठाणे पोलीस शाळेने 11 सुवर्ण, 11 रौप्य आणि 10 कांस्य पदके जिंकली. मुलींच्या गटात 7 सुवर्ण, 12 रौप्य आणि 15 कांस्य जिंकत 86 गुणांसह त्यांनी सांघिक जेतेपद पटकावले. पोलीस शाळेने स्पर्धेत एकूण 21 सुवर्ण, 25 रौप्य आणि 28 कांस्य पदकांवर आपला हक्क गाजवत सर्वसाधारण विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच वसंत विहार शाळेच्या आणि ज्युनिअर कॉलेजने सांघिक स्पर्धेत उपविजेतपद पटकावले. त्यांनी 15 सुवर्ण, 13 रौप्य आणि 15 कांस्य पदके मिळवली. मुलांमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान वसंत विहार शाळेच्या विहान यादवला लाभला तर ठाणे पोलीस शाळेची आर्या पगारे मुलींमध्ये सर्वोत्कृष्ट ठरली.

या स्पर्धेत दक्ष छेडे, आदित्य भगत, राजवीर गडले, दिविशा जैन, जिहंश पाटील, काशवी करंजकर, प्रियांश उतेकर, युतिका पेनुली, युग पाटील, दीपिका सखदेव, नोचुरूवल्लपील अॅन्थनी, आर्यन बच्छाव, क्रिशा शेट्टी, विभावरी खामकर, स्पृहा नाडकर्णी, कामाक्षा दुधाडे या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली.

या दिमाखदार स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक सुहास देसाई यांच्या हस्ते झाले. श्री मावळी मंडळ संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष मनीष मुंदडा, खजिनदार रिक्सन फर्नांडिस, चिटणीस रमण मोरे, उपचिटणीस संतोष सुर्वे, सहचिटणीस चिंतामणी पाटील, विश्वस्त कृष्णा डोंगरे, पॅट्रिक फर्नांडिस, केशव मुकणे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आले.