श्रीवर्धनमध्ये हिट ॲण्ड रन -पुण्यातील दारुड्या पर्यटकांच्या थार गाडीने दुचाकीस्वाराला चिरडले, फरार होण्याच्या तयारीत असलेले सात जण ताब्यात

समुद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर बुधवारी रात्री उशिरा हिट अॅण्ड रनची घटना घडली आहे. पुण्याहून आलेल्या दारुड्या पर्यटकांच्या थार गाडीने दुचाकीस्वाराला चिरडले असून त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. परवेझ हमदुल्ले असे या दुर्दैवी दुचाकीस्वाराचे नाव असून त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तरुणाला उडवल्यानंतर मद्यपी पर्यटक पळून जाण्याच्या तयारीत होते, पण पोलिसांनी सात जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गाडी चाल वणारा हा अल्पवयीन असल्याचे तपासात आढळले आहे.

सध्या पर्यटनाचा हंगाम असल्याने महाराष्ट्राच्या विविध भागांतून श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक येत असतात. बुधवारी रात्री पुण्याहून थार गाडीने श्रीवर्धनमध्ये दाखल झालेले तरुण पर्यटक समुद्रकिनाऱ्याकडे जात होते. त्याचवेळी श्रीवर्धनमध्ये राहणारे परवेझ हमदुल्ले (५३) हे व्यावसायिक आपल्या दुचाकीने घरी जात होते. त्याचवेळी थार गाडीचालकाने त्यांना जोरदार धडक दिली. ती एवढी भयानक होती की हमदुल्ले यांना ४० ते ५० फूट फरफटत नेले.

संतप्त जमावाने मार्ग रोखला
या अपघातामध्ये परवेझ यांच्या डोक्याला जबर मार बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे वृत्त समजताच श्रीवर्धनच्या पोलिसांनी तातडीने धाव घेऊन गाडीतील मद्यधुंद पर्यटकांना ताब्यात घेतले. परवेझ यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, त्यांच्या मृत्यूमुळे श्रीवर्धनमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन वाणीआळी येथील मार्ग काही काळ रोखून धरला. या जमावाने घोषणाही दिल्या तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या अपघातानंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

‘त्या’ अल्पवयीन चालकाला बालसुधारगृहात पाठवले
पुण्याहून आलेल्या पर्यटकांची गाडी एक अल्पवयीन मुलगा चालवत असल्याचे पोलिसांना तपासात दिसून आले. त्याचे आधारकार्ड पाहिले असता तो मुलगा फक्त १७ वर्षांचा आहे. त्याच्या अन्य सात मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अल्पवयीन चालकाची रवानगी कर्जत येथील बालसुधारगृहात करण्यात आली आहे.