
घोडबंदर रोड येथील ओवळा परिसरातील ब्लू रूफ क्लब या लग्नाच्या हॉल ला गुरूवारी रात्री उशिरा अचानक आग लागली. या हॉल मध्ये एका लग्न समारंभाचे रिसेप्शन सुरू होते. यावेळी जवळपास 1 हजार 200 नागरीक हॉल मध्ये उपस्थित होते. आग लागल्याचे समजताच जीव वाचवण्यासाठी सगळ्यांची प्रचंड पळापळ झाली. या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, शहरातील क्लब, हॉटेल, मॉल, हॉस्पिटल, आय टी पार्क आदी आस्थापनाच्या फायर ऑडिटचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
घोडबंदर रोडवरील ओवळा येथे ब्लू रूफ क्लब नावाचे मोठे हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये वाढदिवस, लग्न आणि रिसेप्शनसारखे मोठें सोहळे पार पडतात. गुरुवारी या ठिकाणी एका लग्नाचा रिसेप्शन सोहळा सुरू होता. त्यावेळी या क्लबच्या मागच्या बाजूला असलेल्या एका बंदिस्त गोडाऊन मधील असलेल्या डेकोरेशनचे साहित्य ला अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. लग्न सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांनी तत्काळ बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातील कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान तसेच स्थानिक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी घाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
ठाण्यात लग्नाच्या हॉलला भीषण आग, रिसेप्शन सुरू असताना पळापळ; सुदैवाने अनर्थ टळला. pic.twitter.com/Aagd9Agp7M
— Saamana Online (@SaamanaOnline) December 19, 2025
आगीचं कारण अस्पष्ट
या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाण साहित्याचे नुकसान झाले असले तरी ही आग कशामुळे लागली याचे कारण अध्याप स्पष्ट झालेले नाही अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
फायर एनओसी नसलेल्या आस्थापनांवर कडक कारवाईची मागणी
गोवा येथील क्लबमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील शाळा-महाविद्यालये, हॉटेल, क्लब, मॉल, आयटी पार्क आणि सरकारी कार्यालयांचे फायर ऑडिट करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच सध्या फायर एनओसी नसलेल्या आस्थापनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.































































