चित्रीकरण झालेल्या शाळेतच रंगला ‘क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’ चा ट्रेलर रिलीज

मराठी शाळांच्या अस्तित्वावर मनोरंजक पद्धतीने भाष्य करणाऱ्या बहुप्रतिक्षित ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच अनोख्या पद्धतीने प्रदर्शित झाला. अलिबाग मधील नागाव येथील ज्या शाळेत सिनेमाचे चित्रीकरण झाले त्याच शाळेच्या चौकात ट्रेलर अनावरणाचा सोहळा पार पडला. वर्गखोल्या, बाक, फळा आणि मैदान साक्षीदार असलेल्या या ठिकाणी कलाकार आणि उपस्थितांनी पुन्हा एकदा आपल्या शालेय आणि चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला.

‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ या सिनेमात बंद होत असलेल्या मराठी शाळेची कथा मांडण्यात आली आहे.  हा ट्रेलर मजेशीर, नॉस्टॅल्जिक असतानाच आजच्या काळातील अत्यंत संवेदनशील विषयावर नेमके बोट ठेवताना दिसतो. मराठी शाळा बंद पडण्याच्या चर्चेत असताना, हा सिनेमा मनोरंजनाच्या माध्यमातून मराठी भाषेचे आणि मराठी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ 1 जानेवारी 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि मराठी चित्रपटात पहिल्यांदाच पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट झळकणार आहे. या ट्रेलर मधून अजून एक सरप्राईज समोर आलंय ते म्हणजे अभिनेत्री निर्मिती सावंत आणि त्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग निर्माती आहे. तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

ट्रेलर लाँचच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्रांतिज्योतीच्या शाळेच्या पटांगणात चित्रपटातील कलाकार आणि संपूर्ण टीम एकत्र जमली आणि रंगली आठवणींची, हसण्याची आणि धमाल मस्तीची मैफल. या खास कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्यांच्या गोंडस ‘नाटके मोरा’ या नृत्याने झाली. त्यानंतर रोहित जाधवने आपल्या दमदार आवाजात गायलेलं ‘शाळा मराठी माझी’ गाणं ऐकताना क्षणभर सगळेच आपल्या शालेय दिवसांत हरवून गेले.