
हिंदुस्थानचे शेजारी राष्ट्र पाकिस्तान आणि चीनने बांगलादेशात लष्करी पाय पसरायला सुरुवात केली आहे. बांगलादेशातून शेख हसीना यांचे सरकार पायउतार झाल्यापासून चीनने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बऱयाच चिंताजनक घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात धोकादायक बाब समोर आली असून बांगलादेशात चीन बांगलादेशच्या हवाई दलाच्या लालमोनिरहाट एअरबेसची धावपट्टी बनवत आहे. तसेच बांगलादेशसाठी मोठा पाणबुडी तळ म्हणजेच सबमरीन बेसदेखील बनवत आहे, असा गौप्यस्फोट संसदेत सादर करण्यात आलेल्या संसदीय समितीच्या अहवालातून करण्यात आला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीच्या अहवालाच्या माहितीनुसार, बांगलादेशच्या नौदलाकडे सध्या फक्त 2 पाणबुडय़ा आहेत. चीन हा सबमरीन बेस बांगलादेशच्या पेकुआ येथे विकसित करत आहे. बांगलादेश सरकारने याच वर्षी मार्चमध्ये चीनसोबत एका सामंजस्य कराराला अंतिम रूप दिले आहे. याअंतर्गत मोंगला पोर्टचा 370 दशलक्ष डॉलर्स खर्च करून विस्तार केला जाईल. बांगलादेशात आपले मित्र नसलेल्या देशांचे पाय मजबूत होणे भारताच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहे. लालमोनिरहाट एअरबेस भारताच्या उत्तर सीमेपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे. हा तळ सिलिगुडी कॉरिडॉरच्या कक्षेत येतो, जो चिकननेकचा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. भूतान आणि भारत यांच्यातील चिनी भाग पाहता या एअरबेसचे सामरिक महत्त्व वाढते. संसदीय समितीने यावर चिंता व्यक्त केली.





























































