
>> संजय कऱ्हाडे
कालचा सामना धडामधुडूम होता! बॅटला चेंडू लागला की चौकार अन् षटकारांची बरसात होत होती! सलामीला संजू आणि अभिषेकने आपापल्या बॅटने छान फटाके वाजवले अन् नंतर हार्दिक आणि तिलकने जणू बंदुकाच चालवल्या! दोघांनी विजेच्या वेगाने शतकी भागीदारी केली. हिंदुस्थानी फलंदाजांनी एकूण सव्वीस चौकार अन् दहा षटकार मारून आफ्रिकन गोलंदाजीचा पार चोळामोळा केला. दोनशे एकतीस धावा प्रत्युत्तर म्हणून प्रत्यक्षात उतरवणं कधीच सोपं नसतं. झालंही तसंच. डिकॉकने त्याची खास शैली दाखवली खरी, पण छाती दडपेल अशी वेळ आली नाही. आपल्या बुमरा आणि वरुण नावाच्या दोन अस्त्रांनी आफ्रिकेची सारी शस्त्रं निकामी केली! बुमराची अचूकता आणि वरुणची जादू किमया करून गेली!
सामना आपण धडाक्यात जिंकलो. या विजयातून गंपू गंभीरला बरेच धडे मिळाले असतील अशी आशा आहे! टी–ट्वेंटी सामन्यात सलामीला कुणी जायचं, का जायचं हे त्याला कळलं असावं अशी अपेक्षा आहे! एकेकाळी स्वतः गंपू सलामीचा दमदार फलंदाज होता. वयपरत्वे त्याला विस्मरण झालं असलं तरी अहमदाबादच्या सामन्याने त्याची स्मरणशक्ती जागी व्हावी अशी आम्हा पामरांची इच्छा!
आपल्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात गंपूने तिसऱया क्रमांकावरही फलंदाजी केली होती. पण विसरभोळय़ा गंपूला तिलक वर्माने आजच्या जमान्यातला तिसऱया क्रमांकावर खेळू शकणारा योग्य फलंदाज दाखवून दिला! ‘फॉर्ममध्ये असलेल्या’ पण ‘धावा होत नसलेल्या’ कप्तान सूर्याची जागासुद्धा कुठे असायला हवी तेही तिलकनेच ध्यानात आणून दिलं.
एका छान टुमदार बंगल्यात बळजोरी करून घुसलेल्या दोनपैकी एक शुभमन नामक हत्ती बाहेर गेला आणि बंगल्यातल्या रहिवाशांनी किती छान मोकळेपणाने श्वास घेतला! आता सूर्या नामक हत्तीचीही बोळवण करावी अशी हात-पाय-कान-नाक जोडून हार्दिक विनंती आहे! अन् हार्दिकचा जलवा तर गंपूने पहिला असेलच! हार्दिक कप्तान आणि तिलकला उपकप्तान नेमून विश्वचषकाचा संघ निवडला तर क्रिकेटप्रेमींचे आशीर्वाद मिळतील!




























































