लेफ्टनंट कर्नल दीपक शर्माला सीबीआय कोठडी, परराष्ट्र मंत्रालयातून परवानगी मिळवून देण्यासाठी घेतली लाच

संरक्षण मंत्रालयात तैनात असलेल्या लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा याने दुबईतील एका कंपनीचा माल यूएईला पाठविण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातून काही परवानग्या मिळविण्यासाठी सौदा केला होता, अशी धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे. हे काम फत्ते झाल्यानंतर लाच देण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे परराष्ट्र मंत्रालयातदेखील असल्याचा संशय आहे.

 सीबीआयने शनिवारी शर्मा याला अटक करून त्याच्या विविध ठिकाणांवर छापे मारले होते. त्यात 2.36 कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे की, संरक्षण क्षेत्राशी संबंधित उत्पादन करणाऱया आणि निर्यात करणाऱया कंपन्यांकडून लाच घेऊन अनैतिक लाभ मिळवून देण्याची शर्माला सवय लागली होती. यूएईमधील डी. पी. वर्ल्ड या मालवाहतूक क्षेत्रातील कंपनीसोबत शर्मा याचे काही गैरव्यवहार सुरू असल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. या कंपनीचे राजीव यादव आणि रवजित सिंग हे दोन संचालक हिंदुस्थानातील कामकाज पाहतात. ते शर्मा आणि त्याची पत्नी कर्नल काजल बाली यांच्या नियमित संपर्कात होते. याप्रकरणी अटक केलेल्या दीपक शर्मा आणि विनोद कुमार यांची 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.