मला वाटलं आता सगळं संपलं, पुन्हा कधीच मैदानात उतरायचं नव्हतं! 2023 च्या पराभवानंतर रोहित शर्मा घेणार होता निवृत्ती

मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी करणारा आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवणारा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा 2023 च्या वर्ल्डकप फायनलमधील पराभवानंतर खचून गेला होता. अंतिम लढतीतील पराभवानंतर रोहित शर्माने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर माझ्या अंगात त्राण उरले नव्हते आणि मला पुन्हा कधीच मैदानात उतरायचे नव्हते, अशी कबुली रोहित शर्मा याने दिली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना हिंदुस्थानच्या संघाच्या 2023 च्या वन डे वर्ल्डकपमध्ये सलग 10 विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियात अंतिम सामना रंगला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाने कोट्यवधी हिंदुस्थानी नागरिकांचे स्वप्न धुळीस मिळवत हिंदुस्थानचा पराभव केला. हिंदुस्थानला 240 धावांमध्ये रोखणाऱ्या ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 6 विकेट्स राखून पूर्ण केले आणि वर्ल्डकप जिंकला. या पराभवानंतर रोहित शर्मा कोलमडून गेला होता. मैदानात त्याच्या भावनांचा बांध फुटला होता. या पराभवानंतर आपण निवृत्ती घेणार होतो, असे आता एका कार्यक्रमात बोलताना रोहित म्हणाला.

रोहित शर्मा म्हणाला, परभावानंतर सगळेच खूप निराश झाले होते. नेमके काय घडले यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. माझ्यासाठी तो काळ वैयक्तिकरित्या फार कठीण होता. कारण 2022 मध्ये मी कर्णधारपद स्वीकारले तेव्हापासून हिंदुस्थानला वर्ल्डकप जिंकून देणे हेच माझे ध्येय होते. त्यासाठी मी सर्वस्व पणाला लावली होते. पण जेव्हा पराभव झाला तेव्हा मी सुन्न झालो. मी पूर्णपणे खचून गेलो होतो. मला वाटलं आता मी पुन्हा बॅट हातात घेऊ शकणार नाही. क्रिकेटला कायमचा रामराम करण्याचा विचार मनात डोकावत होता.

2023 च्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माने धावांचा पाऊस पाडला होता. त्याने 125 च्या सरासरीने 597 धावा चोपल्या होत्या. पण फायनलमध्ये ट्रेव्हिस हेडने रोहितचा झेल घेतला आणि त्यानंतर फलंदाजीच शतक ठोकत हिंदुस्थानचा स्वप्न धुळीस मिळवले. तो पराभव रोहितच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यातून सावरण्यासाठी मला दोन महिने लागले. माझ्या अंगात त्राणच उरले नव्हते, असे रोहित म्हणाला.

दरम्यान, 2023 च्या कटू आठवणी विसरून रोहित शर्मा पुन्हा कामाला लागला. हार मानेल तो हिटमॅन कसला. त्याने स्वत:ला सावरले आणि 2024 चा टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचे ध्येय ठेवले व पूर्णही केले. 2024 मध्ये हिंदुस्थानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वविजयाचा तिरंगा फडकावला. याबाबत बोलताना रोहित म्हणाला की, अपयशाने खचून न जाता कसे उभे रहावे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा होता.