
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आणि राज्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेत गंभीर त्रुटी असल्याचा आरोप केला. नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये तृणमूल काँग्रेसच्या बूथ-स्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाले की, निवडणूक आयोग राज्य सरकारला माहिती न देता निरीक्षकांची नियुक्ती करत आहे आणि भाजपचे हित जोपासण्याचे काम करत आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत की, “निवडणूक आयोग भाजपच्या आदेशानुसार काम करत आहे.” त्या म्हणाल्या की, “भाजपा मतदार यादीतून अंदाजे दीड कोटी मतदारांची नावे वगळण्याचा प्रयत्न करत आहे, जे लोकशाहीला कमकुवत करण्यासारखे आहे. इतर राज्यांमधून विशेषतः बिहारमधून, बर्धमान जिल्ह्यात बाईक्स आणल्या जात आहेत आणि निवडणुकीत बाहेरील लोकांना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “ते लोकशाही नष्ट करू इच्छितात. मतुआ आणि आदिवासी समुदाय आता मतदान करू शकणार नाहीत का? ते दोन महिन्यांत एक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे दोन वर्षे लागणारे काम आहे. भाजपने सर्व तपास यंत्रणांना त्यांचे एजंट बनवले आहे.”
























































