भाटिया रुग्णालयात आग, 250 रुग्णांना सुरक्षितस्थळी हलवले

ग्रँट रोड येथील भाटिया रुग्णालयाच्या तळमजल्यावर आज दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. तब्बल दीड तासानंतर आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आहे. आग लागल्याचे समजताच 250 रुग्णांना सुरक्षित  स्थळी हलवल्याने मोठी दुर्घटना टळली.

ग्रँट रोड येथील तुकाराम जावजी मार्गावरील भाटिया रुग्णालयाच्या अंडरग्राउंड भागात दुपारी 1.35 वाजताच्या सुमारास सीटी-एमआरआय युनिटमध्ये विद्युत वायरिंग व विद्युत उपकरणांमध्ये आगीची ठिणगी पडली. इलेक्ट्रिक वायरिंग, यंत्रसामग्री यामुळे ही आग काही वेळातच भडकली. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य सुरू केले. खबरदारी म्हणून सुमारे 250 रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. दरम्यान या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या अग्निशमन दलाकडून देण्यात आली.