
वर्दीतल्या पोलिसाने एका गतिमंद महिलेच्या असह्यतेचा गैरफायदा उचलत तिचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या मैदानात घडला. यावेळी मैदानात असलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्या पोलिसाला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. ताडदेव पोलिसांनी त्या सहाय्यक फौजदाराला अटक केली.
ताडदेव येथील साने गुरुजी मार्गावर भाऊसाहेब हिरे उद्यान आहे. सार्वजनिक मैदान असल्याने नागरिक मोठय़ा संख्येत तेथे येत असतात. सोमवारी सायंकाळी एक वर्दीतला पोलीस तरुणीसोबत बसला असल्याचे नागरिकांनी पाहिले. काही वेळानंतर तो पोलीस तिच्या अंगचटीला जात अश्लील चाळे करू लागला. हा संतापजनक प्रकार पाहून नागरिक एकवटले आणि त्यांनी पोलिसाला पकडून चोप दिला. पोलीस चौकी उद्यानाला लागूनच असल्याने मैदानातील प्रकार कळताच ताडदेव पोलीस घटनास्थळी पोहोचले. गतिमंद महिलेचा विनयभंग करणारा सहाय्यक फौजदार नशेत होता. त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तो सहाय्यक फौजदार पोलिसांच्या ल विभाग 2 येथे नेमणुकीस आहे.




























































