
आवादा कंपनीतील खंडणी प्रकरणात अडथळा येणारे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली. या प्रकरणी आज न्यायालयामध्ये वाल्मीक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. या बहुचर्चीत खटल्याने आता वेग घेतला आहे. पुढची तारीख ८ जानेवारी रोजी निश्चित करण्यात आली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी बीड येथील मकोका न्यायालयामध्ये अत्यंत महत्वाची सुनावणी झाली. सुनावणीनंतर विशेष सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, न्यायालयाने सर्व आरोपींवरील आरोप अधिकृतपणे निश्चित केले आहे. हा खटला तातडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या खटल्यातील आरोपींकडून खटला लांबवण्याचा प्रयत्न होत असला तरी न्यायालयाने त्याला आळा घातल्याचेही अॅड.निकम यांनी स्पष्ट सांगितले. आज न्यायालयामध्ये अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडल्या. न्यायालयाने सर्व आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपशिलवार घटनाक्रम एक एक करून वाचून दाखवला. त्यानंतर न्यायाधीशांनी प्रत्येक आरोपीला हे सर्व आरोप तुम्हाला मान्य आहेत का? असा थेट प्रश्न विचारला. याला उत्तर देताना वाल्मीक कराडसह सर्व आरोपींनी एकमुखाने हे आरोप आम्हाला मान्य नसल्याचे म्हटले. विशेष म्हणजे या प्रकरणात वाल्मीक कराड याने स्वत:हून न्यायालयासमोर उभे राहून आपल्याला आरोप मान्य नसल्याचे सांगितले. या खटल्यात आरोपी जाणुनबुजून वेळ मारून नेत आहेत. न्यायालयाने याबाबत योग्य आदेश द्यावेत अशी मागणी सरकारी वकील उज्वल निकम यांनी केली. आता लवकरच प्रत्यक्ष पुराव्याच्या सादरीकरणाला सुरूवात होणार आहे. हा खटला फास्टट्रॅक पद्धतीने चालवून शक्य तितक्या लवकर निकाली काढला जाणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ८ जानेवारी रोजी असणार आहे. आज सुनावणी दरम्यान न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींचे वकील उपस्थित होते.


























































