
क्रिकेट जगतामध्ये हिंदुस्थान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड सारखे मातब्बर संघ आहेत. दमदार, विस्फोटक आणि वेगावर स्वार होऊन अचूक मारा करणाऱ्या गोलदाजांचा या संघांमध्ये भरणा आहे. मात्र, क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या या संघांमधील गोलंदाजांना जी कामगिरी टी20 क्रिकेटमध्ये करता आली नाही अशी कामगिरी क्रिकेटच्या पटलावर नाव नसणाऱ्या इंडोनेशीच्या एका गोलंदाजाने करून दाखवली आहे.
इंडोनेशियाचा 28 वर्षीय गोलंदाज गेडे प्रियांदाना याने टी20 क्रिकेटमध्ये आपल्या एकाच षटकात पाच विकेट घेण्याचा विश्वविक्रम केला आहे. कंबोडियाविरुद्ध पार पडलेल्या सामन्यात प्रिअदानाने फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवलं. सामन्याच्या 16 व्या षटकामध्ये प्रिअदानाने कंबोडियाचा झोप उडवली. त्याने पाच फलंदाजांना आल्यापावली माघारी तंबुत धाडलं आणि कंबोडियाचा अर्धा संघ आपल्या एकाच षटकात गार केला. पहिल्या तीन चेंडूंमध्ये त्याने तीन विकेट घेत हॅट्रीक घेतली आणि नंतर दोन फलंदाजांना बाद केलं. त्यामुळे कंबोडियाचा संपूर्ण संघ 107 धावांवर बाद झाला आणि इंडोनेशियाने 60 धावांनी सामना जिंकला. एकाच षटकात पाच विकेट घेणारा तो इंडोनेशियाचा पहिला गोलंदाज ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा प्रियांदाना पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी श्रीलंकेच्या लसिथ मलिंगासह 14 गोलंदाजांना आतापर्यंत एकाच षटकात चार विकेट घेतल्या आहेत. तर देशांतर्गत टी-20 क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या अल अमीन हुसैन आणि अभिमन्यू मिथून यांनी पाच विकेट घेतल्या आहेत.



























































