
नागपूर शिक्षक भरती घोटाळ्यात एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी आणखी एका एका शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. एसआयटीने जिल्हा परिषदचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक केली आहे. शालार्थ ऑनलाइन वेतन प्रणालीच्या गैरवापर प्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. काटोलकर यांच्यावर 12 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
आतापर्यंत या प्रकरणात शिक्षण उपसंचालक, अधिकारी, लिपिक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांसह २६ जणांना अटक झाली आहे. काटोलकर यांना मंगळवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले आहे. हा घोटाळा राज्यभर पसरल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.





























































