
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी आणि महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाचे प्रमुख दावेदार सदानंद दाते यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) प्रमुख पदावरून कार्यमुक्त करण्यात आले आहे. केंद्रात प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या दाते यांना तत्काळ मूळ महाराष्ट्र कॅडरमध्ये पाठविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची घरवापसी झाली आहे.
सदानंद दाते यांना एनआयएच्या प्रमुख पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश आज केंद्रीय गृह विभागाकडून जारी करण्यात आले. दाते यांचा एनआयए प्रमुख पदाचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. परंतु तरीही दाते यांना मुदतीआधीच केंद्रीय गृह विभागाकडून एनआयए प्रमुख पदावरून कार्यमुक्त करण्यात आले. तसेच तत्काळ दाते यांना त्यांच्या मूळ कॅडरमध्ये परत पाठविण्यात यावे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सदानंद दाते आता प्रतिनियुक्तीवरून महाराष्ट्र पोलीस दलाच्या सेवेत दाखल होतील. रश्मी शुक्ला यांचा पोलीस महासंचालक पदाचा वाढीव दोन वर्षांचा कार्यकाळ येत्या 31 डिसेंबर रोजी संपत आहे. त्यानंतर 90च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले सदानंद दाते हे महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारतील.






















































