इस्रोने अंतराळात रचला इतिहास, ‘बाहुबली’ रॉकेटमधून ब्लू बर्ड-2 चे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने बुधवारी सकाळी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून LVM3-M6 रॉकेट वापरून अमेरिकन उपग्रह ब्लूबर्ड ब्लॉक 2 चे प्रक्षेपण केले. 6,100 किलोग्रॅम वजनाचा, ब्लूबर्ड हा भारताकडून अवकाशात सोडण्यात आला आहे. हा आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह आहे. नोव्हेंबरमध्ये प्रक्षेपित करण्यात आलेला मागील LVM3-M5 कम्युनिकेशन सॅटेलाईट-03 सुमारे 4, 400 किलोग्रॅम वजनाचा होता आणि त्याला जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये ठेवण्यात आले होते.

ब्लूबर्ड ब्लॉक-2 वाहून नेणारे LVM3-M6 रॉकेट 640 टन वजनाचे आहे. ब्लूबर्ड ब्लॉक-2 हा पुढील पिढीचा संप्रेषण उपग्रह आहे जो सामान्य स्मार्टफोन्सना थेट हाय-स्पीड सेल्युलर ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी डिझाइन केलेला आहे. हा उपग्रह पृथ्वीवर कुठूनही 4G आणि 5G व्हॉइस कॉल, व्हिडिओ कॉल, मेसेजिंग, स्ट्रीमिंग आणि डेटा सेवा देणार आहे. हे अभियान न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) आणि यूएस-आधारित AST स्पेसमोबाइल (AST & Science, LLC) यांच्यातील व्यावसायिक कराराचा एक भाग आहे. न्यूस्पेस इंडिया ही ISRO ची व्यावसायिक शाखा आहे.

इस्रोच्या मते, अंदाजे 43.5 मीटर उंच LVM3-M6 रॉकेट बुधवारी सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील दुसऱ्या लाँच पॅडवरून उड्डाण केले. सुमारे 15 मिनिटांच्या उड्डाणानंतर, ब्लूबर्ड ब्लॉक-2 उपग्रह रॉकेटपासून वेगळा झाला आणि अवकाशापासून सुमारे 520 किमी वर लो अर्थ ऑर्बिट (LEO) मध्ये यशस्वीरित्या स्थापित करण्यात आला.

हे रॉकेट 90 सेकंद उशिरा, सकाळी 8 वाजून 55 मिनिटांनी उड्डाणास सज्ज झाले. याची आधीची वेळ ही सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी करण्याचे ठरले होते. इस्रोच्या मते, हजारो सक्रिय उपग्रह श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून सतत जात होते. इतर उपग्रहांशी टक्कर होण्याच्या धोक्यामुळे मोहिमेचा प्रक्षेपण वेळ 90 सेकंदांनी वाढविण्यात आला.

LVM3-M6, ज्याला GSLV Mk-III असेही म्हणतात, हे इस्रोचे तीन-टप्प्यांचे रॉकेट आहे. ते इस्रोच्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटरने विकसित केलेल्या क्रायोजेनिक इंजिनद्वारे चालवले जाते. उड्डाणासाठी, रॉकेट तिरुवनंतपुरममधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरने विकसित केलेल्या दोन S200 सॉलिड रॉकेट बूस्टरद्वारे चालवले जाते. हे LVM3 चे सहावे उड्डाण आहे आणि ब्लूबर्ड ब्लॉक-2 उपग्रहाचे तिसरे व्यावसायिक अभियान आहे. इस्रोच्या मते, LVM3 ने आतापर्यंत सलग आठ यशस्वी प्रक्षेपण पूर्ण केले आहेत, ज्यात चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 सारख्या प्रमुख मोहिमांचा समावेश आहे. याच रॉकेटने 2023 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 लाँच करून इतिहास रचला. त्याच्या प्रचंड वजनामुळे, लोकप्रिय चित्रपट बाहुबलीपासून प्रेरित होऊन, LVM3 ला जनता आणि माध्यमांनी “बाहुबली रॉकेट” असे टोपणनाव दिले आहे.