तीन नव्या विमान कंपन्यांसाठी हिंदुस्थानचे आकाश खुले, इंडिगो-एअर इंडियाच्या मक्तेदारीला आव्हान

अल हिंद एअर आणि फ्लाय एक्स्प्रेस या दोन पंपन्यांना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील ‘शंख एअर’ या कंपनीला यापूर्वीच एनओसी मिळाली असून ही कंपनी लवकरच सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे देशात नव्या वर्षात तीन नव्या कंपन्यांची सेवा सुरू होणार आहे.

इंडिगो आणि एअर इंडिया दोन कंपन्यांकडेचं जवळपास 90 टक्के वाटा आहे. त्यामुळे देशात विमान कंपन्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.

नव्या कंपन्यांचे नियोजन काय?

‘अल हिंद एअर’ ही कोची येथील अल हिंद समूहाची कंपनी आहे. सुरुवातीला एटीआर72-600 या विमानांद्वारे देशांतर्गत सुरू करून पुढे विस्तार करण्याची पंपनीची योजना आहे. ‘फ्लाय एक्स्प्रेस’देखील लवकरच सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. तर, शंख एअरला लवकरच नवी विमाने ताब्यात मिळणार आहेत. पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत सेवा सुरू होईल. त्यानंतर ताफा 20 ते 25 विमानांएवढा वाढविण्याची शंख एअरची योजना आहे.