नव्या दमाच्या सम्राट, विजयज्योती, अभिमन्यू, बाजीसह 13 अश्वांची पोलीस दलात भरती, मुंबई पोलिसांचे माऊंटेड पथक नव्या ढंगात

>>आशिष बनसोडे

मुंबई पोलिसांच्या माऊंटेड पथकात आता नवीन भरती झाली आहे. ‘बाजी’, ‘अभिमन्यू’, ‘विजयज्योती’, ‘सम्राट’ यांच्यासह नव्या दमाचे 13 अश्व या दलात सहभागी झाले आहेत. सोबतीला ‘बादल’, ‘तुफान’ आणि ‘चेतक’ हे आधीचे अश्व जोडीला असल्याने पथकातील अश्वांची संख्या 16 झाली आहे. लवकरच आणखी पाच अश्व येणार असून 21 अश्वांचे पथक नव्या दमात आणि मोटय़ा दिमाखात कार्यरत होणार आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात हे पथक संचलनात सहभाग घेणार आहे.

2021 मध्ये मुंबई पोलीस दलात तब्बल 88 वर्षांनंतर माऊंटेड पथक सुरू करण्यात आले होते. तेव्हा 33 अश्व दलात घ्यायचे प्रस्तावित होते. परंतु 13 अश्व घेतले आणि त्यांच्यासाठी मरोळ सशस्त्र पोलीस दलात तबेल्याची सुविधा करण्यात आली होती. पथक सुरू तर झाले, पण तेव्हा कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनचा ब्रेक लागला आणि पथकाचे कामकाज प्रत्यक्षात सुरूच झाले नाही. असे असताना काही कालावधीत पाच अश्वांनी या पथकाची साथ सोडली, तर काही अश्वांना नाशिक पोलीस अकादमीमध्ये पाठवून देण्यात आले होते.

अलिशान तबेला, स्वीमिंग पूल अन् बिकानेर वाळूचे मैदान

मरोळ पोलीस वसाहतीत माऊंटेड पथकासाठी मुंबई पोलिसांच्या नावाला साजेसा असा अलिशान तबेला उभारण्यात आला आहे. तळ अधिक दोन मजल्यांची ती वास्तू असून तेथे 36 अश्वांसाठी वैयक्तिक स्टेबल, सहा तबेल्यांचे आयसोलेशन विभाग, रायडर्स तसेच कर्मचाऱयांना विश्रांतीसाठी उत्तम सुविधा करण्यात आली आहे. या अश्वांना 23 प्रकारचे खाद्यपदार्थ देण्यात येत असून दिवसांतून चार वेळा ते दिले जाते. त्यांच्यासाठी खास बिकानेर वाळूचे मैदान बनविले असून स्वीमिंग पूलदेखील बांधण्यात येत आहे.

– ‘शिवालिक’, ‘विजयज्योती’, ‘अभिमन्यू’, ‘कृष्णा’, ‘पद्मा’, ‘अर्जुन’, ‘रणवीर’, ‘समाचार’, ‘चेरी’, ‘ट्राफिकलमिस्ट’,‘सम्राट’, ‘बाजी’ असे त्यांचे नामकरण करण्यात आले आहे. तेलंगणाच्या विकाराबाद येथून नऊ आणि हरियाणाच्या टोहानातून चार अश्व आणण्यात आले आहेत.

– 40 रायडर्सची नेमणूक या अश्वांवर करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी पुण्यातले लेफ्टनंट कर्नल सोहेल नगरकर तसेच राजस्थानमधील दोघा प्रशिक्षणाची मदत घेतली जात आहे. तसेच तीन डॉक्टर आणि पोलीस अधिकारी सागर शिंदे, नवनाथ कांगणे आदी तैनात केले आहेत.