
पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याआधीच पक्षांतराचे राजकारण वेग घेऊ लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवलेली बंगाली अभिनेत्री पर्णो मित्रा यांनी पक्षाला रामराम ठोकत तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केला आहे. कोलकात्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी औपचारिकरित्या टीएमसीची सदस्यता स्वीकारली. टीएमसीमध्ये प्रवेश केल्यानंतर पर्णो मित्रा यांनी भाजपात प्रवेश करण्याचा आपला निर्णय चुकीचा ठरल्याचे सांगितले आणि आता त्या चुका दुरुस्त करण्याची वेळ आल्याचेही स्पष्ट केले.
पश्चिम बंगालमधील लोकप्रिय दूरदर्शन अभिनेत्री पर्णो मित्रा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीत प्रवेश करणं ही आपल्यासाठी मोठी संधी असल्याचे म्हटले. सहा वर्षांपूर्वी आपण भाजपात प्रवेश केला होता, परंतु तिथे गोष्टी नीट चालत नव्हत्या, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. 2019 मध्ये भाजपात प्रवेश करून पर्णो मित्रा यांनी सक्रिय राजकारणाची सुरुवात केली होती.




























































