
हिंदुस्थानामध्ये वाइनप्रेमींची कमतरता नाही. अनेक देशांमधून प्रसिद्ध वाइन देशात आयात केल्या जातात आणि त्यांना खूप मागणी असते. यावेळी बाजारात रशियन वाइनप्रेमी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. 2025 च्या पहिल्या 10 महिन्यांत 520 टन व्हिस्की, जिन, वोडका आणि इतर उत्पादने हिंदुस्थानात आली आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार, या वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांमध्ये हिंदुस्थानमध्ये रशियन स्पिरिट्सची निर्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत जवळजवळ चौपट वाढली आहे.
यामुळे हिंदुस्थान हा रशियन निर्यातदारांसाठी एक आकर्षक उदयोन्मुख बाजारपेठ बनला आहे. रशियन कृषी मंत्रालयाच्या फेडरल अॅग्रिकल्चरल एक्सपोर्ट डेव्हलपमेंट सेंटर (अॅग्रोएक्सपोर्ट) कडून मिळालेल्या आकडेवारीचा हवाला देत, आघाडीचे आर्थिक आणि व्यावसायिक दैनिक वृत्तपत्र “वेदोमोस्ती” ने म्हटले आहे की, हिंदुस्थान वोडका आणि इतर हार्ड अल्कोहोलिक पेयांच्या रशियन निर्यातदारांसाठी एक आकर्षक बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे.
अहवालात असे म्हटले आहे की, 2025 च्या पहिल्या 10 महिन्यांत, रशियन स्पिरिट्स उत्पादकांनी हिंदुस्थानात अंदाजे 520 टन स्पिरिट्स (व्होडका, जिन, व्हिस्की आणि लिकरसह) निर्यात केले आहे. याची किंमत 900,000 अमेरिकन डॉलर्स इतकी होती. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण तिप्पट आणि आर्थिक मूल्याच्या चार पट आहे. अॅग्रोएक्सपोर्टचा दावा आहे की, निर्यातीचा मुख्य चालक व्होडका होता. आर्थिक दृष्टीने, या 10 महिन्यांत त्यांची निर्यात अंदाजे 760,000 अमेरिकन डॉलर्स इतकी होती.
जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत रशियन वाइनच्या सर्वात मोठ्या आयातदारांमध्ये हिंदुस्थान केवळ 14 व्या क्रमांकावर होता. रशियन वाइनच्या इतर प्रमुख आयातदारांमध्ये कझाकस्तान, जॉर्जिया, चीन, अझरबैजान, आर्मेनिया आणि बेलारूस यांचा समावेश आहे.

























































