
नगर परिषद निवडणुकीत जळगावमध्ये झालेल्या भाजपच्या पराभवानंतर जिह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. अपशकुनी म्हणत भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी भुसावळमधील पराभवाचे खापर खडसे यांच्यावर फोडले. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पराभवाची जबाबदारी झटकू नका, असे म्हणत महाजन यांना खडे बोल सुनावले. मी आता भाजपचा विरोधक आहे. त्यामुळे माझ्यामुळे जर भाजपचा पराभव झाला असेल तर ती माझ्यासाठी आनंदाचीच बाब आहे, असा खोचक टोलाही खडसे यांनी लगावला.
गिरीश महाजन आपल्या सोयीनुसार बोलतात. जिह्यात ज्यांनी विजयाची जबाबदारी घेतली होती, तेच आता या पराभवाला जबाबदार आहेत. मग या पराभवाचे खापर दुसऱयांवर का फोडता? मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी रिंगणातच नसल्याने तिथे आमचा पराभव झाला असे म्हणणे चुकीचे असल्याचे खडसे म्हणाले.
मी आजवर कुठल्याही निवडणुकीत प्रभारी पद स्वीकारलेले नाही. माझ्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे मला निवडणुकीत फिरणे शक्य नाही. म्हणूनच मी स्वतः हे पद नाकारले आहे. मला राष्ट्रवादीत डावलले गेलेले नाही, असे स्पष्टीकरण खडसे यांनी संतोष चौधरी यांच्या प्रभारी पदी झालेल्या नियुक्तीबाबत केले.
































































