गृहपाठ न केल्याने विद्यार्थ्यांना अर्धनग्न करून दिली शिक्षा, व्हायरल फोटोनंतर शिक्षण विभागाने केली कारवाई

मध्य प्रदेशच्या सिहोरमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. येथील एका शाळेत गृहपाठ न केल्याने विद्यार्थ्यांना अर्धनग्न करून शिक्षा देण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारत मुख्याध्यापकासह ड्रायव्हर, सुरक्षा रक्षकाचे निलंबन केले आहे. सोबतच शाळेला एक लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सिहोरमधील खेडा येथील एका खासगी शाळेत हा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर अर्धनग्न विद्यार्थ्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर घटना चर्चेत आली. हा फोटो समोर आल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटकांनी यांच्याविरोधात आंदोलन केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शाळेतील मुलांशी बोलून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. याप्रकरणी जिल्हा शिक्षण अधिकारी संजय सिंह तोमर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी केली आहे आणि ते मुलांशी बोलले आहेत. मुलांनी गृहपाठ न केल्यामुळे त्यांना ती शिक्षा करण्यात आली होती. व्हायरल झालेला फोटो दोन ते तीन महिने जुना आहे. या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक, चालक आणि सुरक्षा रक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे. शाळेवर एक लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.