
मुंबईतील जागांबाबत एकमत होत नसल्याने वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची जागावाटपाची चर्चा थांबली आहे. मुंबई पालिकेच्या 227 पैकी 70 जागांची मागणी वंचितने काँग्रेसकडे केली आहे. 20 जागांची जी पहिली यादी सादर केली त्यावर कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका वंचितने घेतल्याने जागावाटपाबाबत तिढा निर्माण झाला आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केली असली तरीही काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी काँग्रेसच्या दिल्लीतील प्रतिनिधींनी मध्यंतरी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती.
या पार्श्वभूमीवर वंचितकडून काँग्रेसला 20 जागांची पहिली आणि 50 जागांची दुसरी यादी देण्यात आली होती. मुंबईतील 227 पैकी या 70 जागा वंचितला हव्या आहेत. यापैकी पहिल्या यादीतील 20 जागांवर कोणतीही तडजोड न करण्याची वंचितची भूमिका आहे. पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष चेतन अहिरे यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबतची भूमिका स्पष्ट केली.
पहिल्या यादीतील 20 पैकी दोन जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. या जागा काँग्रेसला आपल्या नेत्यांच्या मुलांसाठी हव्या आहेत, असे अहिरे यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पाच वर्षापासून तेथे काम करत आहेत. त्यांना डावलून एखाद्या काँग्रेस नेत्याच्या नातेवाईकाला त्या जागा का द्याव्यात यांचे स्पष्टीकरण आम्हाला काँग्रेसने द्यावे, अशी मागणी अहिरे यांनी यावेळी केली.
























































