
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि मनसेच्या युतीची महायुतीने चांगलीच धास्ती घेतली आहे. मुंबईत पालिकेच्या 207 जागांवर महायुतीचे एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. 20 ठिकाणी विरोधी पक्षाकडून कोण उमेदवार असेल यावरून भाजप की शिंदे गट लढणार हे ठरविण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या जागावाटपासंदर्भात भाजप आणि शिंदे गटाची एकत्रित बैठक आज झाली. यामध्ये भाजप लढणार असलेल्या 128 आणि शिंदे गटाकडून लढविण्यात येणाऱ्या 79 अशा एकूण 207 जागांवर एकमत झाले. उर्वरित 20 जागांसंदर्भात समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून भाजप लढणार की शिंदे गट लढणार याचा निर्णय घेऊ, अशी माहिती मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी दिली.
गरज पडल्यास उमेदवारांची अदलाबदली
महायुती कशी जिंकणार याचे नियोजन आम्ही करत आहोत. एकमेकांना विश्वासात घेऊन प्रत्येक उमेदवार कसा निवडून येईल यावर पह्कस आहे. उमेदवार कुठला जिंकेल हा निकष आहे. संख्याबळ दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचे नाही. गरज असेल तिथे उमेदवारांची अदलाबदल केली जाईल, अशी माहिती शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांनी दिली.
रिपब्लिकन पक्षाकडून 17 जागांची मागणी
मुंबई महापालिकेसाठी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेकडून मुंबईतील 17 जागांची मागणी करण्यात आली आहे. त्यांची शिंदे गटासोबत युती असून शीव, धारावी येथे प्रत्येकी 1 जागेची मागणी रिपब्लिकन पक्षाने केली आहे. चेंबूर, कुर्ला विभागातील 8 जागा आणि उपनगरातील 7 जागांची रिपब्लिकन सेनेकडून शिंदेंच्या शिवसेनेकडे मागणी करण्यात आली आहे.
























































