
हिंदुस्थानात घरोघरी सोने साठवून ठेवण्याची प्राचीन परंपरा राहिली आहे. अनेक जण सोन्यात गुंतवणुकीला प्राधान्य देतात. देशातील कुटुंबांमध्ये किती सोने असावे? तर तब्बल 34,700 टन एवढे सोने लोकांच्या घरात आहे आणि याची किंमत तब्बल 45 लाख कोटी एवढी आहे. हिंदुस्थानच्या जीडीपीपेक्षा जास्त सोने नागरिकांनी घरात ठेवले आहे.
मॉर्गन स्टेनलीच्या एका अहवालात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार हिंदुस्थानी नागरिकांच्या घरात 34,600 टन सोने आहे. सध्या सोन्याचा भाव 1.38 लाख रुपये प्रतितोळा एवढा आहे. हिंदुस्थानचा जीडीपी 4.1 ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 37 लाख कोटी रुपये एवढा आहे. सोन्याचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचल्यामुळे असे घडले आहे. हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेत सोन्याचे सांस्कृतिक, आर्थिक आणि मानसिक महत्त्व यातून दिसून येते.
सोन्याचे भाव वाढल्यामुळे लोक जास्त खर्च करतात का?
हिंदुस्थानात 75-80 टक्के सोने हे दागिन्यांच्या स्वरुपात आहे. लोक याकडे दीर्घकालीन गुंतवणूक आणि परंपरा म्हणून पाहतात. लोक ते विकत नाहीत. त्यामुळे त्याची किंमत वाढली तरीही लोकांच्या दैनंदिन खर्चावर परिणाम होत नाही. संपत्तीचे मूल्य वाढले की लोक स्वतःला श्रीमंत समजतात आणि जास्त खर्च करू लागतात, असे मानले जाते. मात्र मॉर्गन स्टेनलीचा अहवाल याविरुद्ध माहिती देतो. केवळ सर्वसामान्य लोकच नव्हे, तर आरबीआयदेखील मोठय़ा प्रमाणात सोन्याचा साठा वाढवीत आहे.



























































