
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी दिलेली ई-केवायसी करण्याची मुदत उद्या बुधवारी संपुष्टात येत आहे. आता केवायसीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे साठ लाख लाडक्या बहिणी बाद होण्याची शक्यता आहे. बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेत अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींना दर महिना दीड हजार रुपये दिले जात होते. पण त्यापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्याशिवाय जिल्हा परिषद तसेच पोलीस खात्यातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. सुमारे 2 कोटी 45 लाख लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेत होत्या; पण या योजनेमुळे सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार आता असहय़ होऊ लागल्याने लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्यासाठी ई-केवायसी सक्तीचे केले.
या योजनेच्या निकषात न बसताही दर महिन्याला दीड हजार रुपये घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामध्ये एक वेतनवाढ रोखण्यात येणार असून खात्या अंतर्गत चौकशीही होणार आहे.






























































