पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीत बिघाडी, दादांच्या मनमानीमुळे बिनसले

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी बिघाडी झाल्याचे समोर आले आहे. आयात उमेदवारांमुळे ऐनवेळी अजित पवार यांनी मनमानी केल्याने शरद पवार गटातील उमेदवारांची अडचण झाली. त्यामुळे शरद पवार गटानेदेखील शेवटच्या क्षणी सर्व इच्छुकांना एबी फॉर्म वाटप करत अर्ज भरण्यास सांगितले.

महाविकास आघाडीची साथ सोडत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने अजित पवार गटाशी हातमिळवणी केली. पण तिथेही जागावाटप आणि निवडणुकीतील चिन्हावरून दोन्ही गटांची युती फिस्कटली. त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडीकडे येत जागावाटपाचे संधान साधले. मात्र, महाविकास आघाडीच्या बैठकीला दांडी मारत अचानक शरद पवार गटाने अजित पवार गटाशी गट्टी केली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या चर्चा झाल्या. अजित पवार गटाला 125 जागा तर शरद पवार गटाला 40 जागा असा फॉर्म्युला निश्चित केल्याचे सांगण्यात आले. मात्र, उमेदवारी अर्ज भरताना अजित पवार गटाने बहुतांश घडय़ाळ चिन्हावर उमेदवार दिले. त्यामुळे शरद पवार गटानेदेखील शेवटच्या क्षणी ज्या त्या प्रभागातील इच्छुकांना एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या.