रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला देहरेत तरुणाचा बळी, बस-दुचाकी अपघात; ग्रामस्थांनी अहिल्यानगर-मनमाड मार्ग रोखला

अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे आज एका तरुणाचा बळी गेला. देहरे येथे बस-दुचाकी अपघातात तरुण  ठार झाला. रितेश खजिनदार (वय 20) असे तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर देहरे, विळद, शिंगवे, नांदगाव येथील संतप्त ग्रामस्थांनी अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक अडीच तास ठप्प झाली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यात येतील, असे आश्वासन दिल्याने रास्ता रोको आंदोलन मागे घेतले.

अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील पडलेल्या खड्डय़ांमुळे आत्तापर्यंत अनेकांचा मृत्यू झाला आहे. वारंवार मागणी करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात नाहीत. देहरे येथील पोलीस-पाटील यांचा मुलगा रितेश खजिनदार दुचाकीवरून जात असताना बसने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत रस्त्यावरील खड्डय़ांमुळे शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही, तोपर्यंत रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात येणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक अडीच तास ठप्प झाली. दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी सरपंच जालिंदर कदम, राजकुमार आघाव, व्ही. डी. काळे, विश्वास जाधव, अनिल चोर, महेंद्र कोळपकर, प्रकाश लांडगे, विठ्ठल पठारे उपस्थित होते.

20 वर्षांपासून भुयारी मार्ग रखडला

देहरे गावामधून अहिल्यानगर-मनमाड महामार्ग गेला आहे. तसेच येथून रेल्वे लाईनही गेलेली आहे. महामार्गालगत दोन्ही बाजूला गाव असल्यामुळे भुयारी मार्ग करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. गेल्या 20 वर्षांपासून भुयारी मार्ग रखडला आहे. प्रशासनाला अजून किती बळी हवे आहेत, असा सवाल नागरिकांनी केला.