
विविध उपाययोजना करूनही मुंबईचे प्रदूषण काही आटोक्यात येत नाही यावरून हायकोर्टाने फटकारल्यानंतर पालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. धुळीमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी पालिका 41 टँकर्सच्या माध्यमातून मुंबईचे रस्ते धुणार असून त्यासाठी 2 लाख 94 हजार लिटर पाणी वापरणार आहे. प्रशासनाकडून याबाबतची माहिती हायकोर्टात देण्यात आली आहे.
मुंबईतील वाढते प्रदूषण व खराब वातावरणाची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. या याचिकेवर नुकतीच मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी न्यायालयाने मुंबई शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल उपस्थित पालिका आयुक्तांना फटकारले. पालिका काहीही करत नाही. वायू प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी किमान पावलेही उचलत नाही. कारण पालिकेला ही समस्या सोडवण्याची इच्छाच नाही, असे खडे बोल न्यायालयाने पालिकेला सुनावले होते. त्या वेळी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी वॉर्ड पातळीवर विविध उपाययोजना आखण्यात आल्याची माहिती प्रशासनाने खंडपीठाला दिली होती.
पालिकेच्या माहितीनुसार 5 हजार लिटर क्षमतेचे 20 टँकर्स, 9 हजार लिटर क्षमतेचे 16 टँकर्स व 10 हजार लिटर क्षमतेच्या 5 टँकर्सच्या माध्यमातून मुंबईतील रस्ते धुण्यात येणार आहेत. हे काम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आले असून पुढील तीन महिने म्हणजेच फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
दोन शिफ्टमध्ये फवारणी
महापालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये टँकरच्या माध्यमातून रस्त्यांची धुलाई केली जात आहे. मुंबईतील नेमके कोणते रस्ते धुतले जातात व धुण्यात येणार आहेत याची माहिती प्रशासनाने दिली नसली तरी शहर, उपनगरातील रस्त्यांवर दोन शिफ्टमध्ये पाण्याची फवारणी केली जात असल्याचे पालिकेने दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.
वॉच टॉवर, ड्रोन अन् सीसीटीव्ही


























































