
मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर कल्याणपुढील लोकल प्रवासाला गती मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पांतर्गत (एमयूटीपी-३बी) बदलापूर आणि कर्जतदरम्यान तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेचे बांधकाम करण्यास मंजुरी दिली आहे. यापूर्वी या प्रकल्पाला आर्थिक व्यवहारांशी संबंधित मंत्रीमंडळ समितीने मंजुरी दिली होती. त्यापाठोपाठ आता रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पाच्या अंमलबजावणीला ‘ग्रीन सिग्नल’ दाखवला आहे.
बदलापूर आणि कर्जत स्थानकांदरम्यान 32.46 किमी उपनगरी रेल्वे विभागाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारची मान्यता आधीच मिळवलेला हा प्रकल्प मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) राबवण्यात येणार आहे. अतिरिक्त मार्गिकांमुळे बदलापूर, वांगणी, शेलू, नेरळ, भिवपुरी रोड आणि कर्जत या उपनगरी स्थानकांतील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. सध्या बदलापूर ते कर्जतदरम्यान केवळ दोनच मार्गिका आहेत. त्यावरुन लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्याचे आव्हान मध्य रेल्वे प्रशासनापुढे असते. अतिरिक्त मार्गिकांअभावी जादा लोकल फेऱ्या चालवणे शक्य झालेले नाही. आता रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिल्यामुळे तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचा प्रकल्प मूर्त रुपात येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
1,324 कोटी रुपयांचा प्रकल्प
रेल्वे मार्गिकांच्या चौपदरीकरणासाठी सरकारी आणि रेल्वेच्या जमिनीव्यतिरिक्त जवळपास 37.79 हेक्टर खासगी जमिनीची आवश्यकता आहे. प्रकल्पाचा खर्च 1324 कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय अर्थसंकल्पीय तरतुदीद्वारे प्रकल्पाच्या खर्चाचा निम्मा-निम्मा भार पेलणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-चेन्नई मार्गावरील प्रवासी क्षमता वाढणार आहे. तसेच लोकल आणि मेल-एक्सप्रेसच्या गाड्या स्वतंत्रपणे धावणार असल्याने लोकल ट्रेन आणि स्थानकांतील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
तीन-चार वर्षांत प्रकल्प पूर्ण होणार
तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेमुळे उपनगरी सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक अधिक सुरळीत होईल. उच्च घनता मार्गावर कार्यक्षम मालवाहतूक करणे शक्य होईल, अशी प्रतिक्रिया एमआरव्हीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी दिली. भूसंपादन झाल्यानंतर तीन ते चार वर्षांत चौपदरीकरणाचा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

























































