
मराठी रंगभूमीवरचे दोन सर्जनशील, संवेदनशील आणि बहुमुखी कलावंत मधुगंधा कुलकर्णी आणि निपुण धर्माधिकारी प्रथमच एकत्र येत ‘लग्नपंचमी’ हे नवीन नाटक नवीन वर्षाच्या सुरुवातीला रंगभूमीवर घेऊन येत आहेत. या नाटकात अभिनेता स्वप्नील जोशी प्रमुख भूमिकेत आहे.
मराठी मनोरंजनविश्वात सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असलेला स्वप्नील जोशी सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. एकीकडे नागराज मंजुळे यांच्या आगामी ‘माचो’ चित्रपटातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरत असतानाच, दुसरीकडे तो रंगभूमीवरही दमदार पुनरागमन करत आहे.
मराठी रसिकांशी असलेले आपले नाते अधिक घट्ट करताना स्वप्नील म्हणतो की, ‘नाटक ही मराठी माणसाची ओळख आहे. रसिकांचा रंगभूमीशी असलेला भावनिक धागा आजही तितकाच मजबूत आहे.’ तब्बल बारा वर्षांपूर्वी ‘गेट वेल सून’ या नाटकात काम केल्यानंतर आता तो ‘लग्नपंचमी’ या नव्या नाटकातून पुन्हा रंगमंचावर अवतरतो आहे.
‘लग्नपंचमी’मधील भूमिका ही खास मराठी प्रेक्षकांसाठी असल्याची भावना स्वप्नील व्यक्त करतो. या नाटकात अभिनेत्री अमृता खानविलकर प्रमुख भूमिकेत झळकणार असून या जोडीला रंगमंचावर पाहण्यासाठी रसिकांमध्ये आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे.































































