
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेत स्थलांतर करणं दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अमेरिकेचे ग्रीन कार्ड मिळवणे हे अनेक स्थलांतरितांचे स्वप्न असते. मात्र आता अमेरिकन नागरिकाशी विवाह करून हे ग्रीन कार्ड मिळवता येणार नाहीए. अमेरिकेचे इमिग्रेशन तज्ज्ञ ब्रॅड बेर्नस्टेन यांनी याबाबत कठोर इशारा दिला आहे. अमेरिकन कायद्यानुसार जोडीदाराला ‘इमिजिएट रिलेटिव्ह’ (जवळचे नातेवाईक) मानले जात असले तरी, सध्याच्या प्रशासकीय धोरणांमुळे या अर्जांची अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेत विवाहावर आधारित ग्रीन कार्ड अर्जांच्या तपासणी प्रक्रियेत मोठे बदल झाले आहेत. एखाद्या जोडप्याचा विवाह हा केवळ कागदोपत्री नसून तो विवाह खऱ्या अर्थाने टिकणारा आणि प्रामाणिक आहे की नाही याची सखोल चौकशी अधिकाऱ्यांद्वारे केली जाणर आहे. ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी केवळ लग्नाचे नाते असून चालणार नाही तर, पती-पत्नीने एकत्र राहणे गरजेचे आहे, असे ब्रॅड बेर्नस्टेन यांनी स्पष्ट केले आहे. तुम्ही एकाच छताखाली राहत नसाल तर, तुमचा अर्ज नाकारला जाण्याची दाट शक्यता आहे,” असे त्यांनी नमूद केले.
पती-पत्नी कामासाठी, शिक्षणासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव वेगळे राहत असतील, तरी इमिग्रेशन विभागाकडून त्यांची कसून चौकशी केली जाईल. एकदा का या प्रक्रियेत संशय निर्माण झाला की, घराची तपासणी किंवा चौकशी सुरू होते. अशा परिस्थितीत अर्ज नाकारला जाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जर कोणाला विवाहाच्या आधारे ग्रीन कार्ड हवे असेल, तर त्यांनी एकत्र राहणे हाच एकमेव पर्याय आहे, असे बेर्नस्टेन यांनी सांगितले.
जे दाम्पत्य विवाहित असूनही एकत्र राहत नाहीत, त्यांनी कोणताही अर्ज दाखल करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे. केवळ कागदोपत्री लग्नाचा आधार घेतल्यास लग्नातील फसवणुकीचे गुन्हे दाखल होऊ शकतात. मुलाखतीत अडचणी येऊ शकतात किंवा थेट हकालपट्टीची वेळही येऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.





























































