Indore Water Contamination Row – इंदूरच्या लोकांना पाणी नाही तर विष पाजलं, राहुल गांधी यांचा भाजपवर हल्लाबोल

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भागीरथपुरामध्ये दुषितपाणी प्यायल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. तर 338 नवे रुग्ण सापडले आहेत. या घटनेने संपूर्ण राजकारण तापले आहे. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. इंदूरच्या लोकांना पाणी नाही तर, विष पाजलं गेलं आणि प्रशासन मात्र कुंभकरणाची झोप घेत असल्याचा संताप व्यक्त केला.

राहुल गांधी यांनी आपले सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.  मध्य प्रदेशमधील भाजप मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरही राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली. घराघरात दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गरीब असहाय्य आहे आणि भाजप नेते बेताल वक्तव्य करत सुटले आहेत. राहुल गांधी म्हणाले की, इंदूरमध्ये पाणी नाही तर सामान्य लोकांना विष पाजलं गेलं आणि प्रशासन मात्र कुंभकरणाची झोप घेत आहे. ज्यांच्या घरातील चूल विझली आहे, त्यांना सांत्वन हवंय. मात्र सरकारने त्यांच्या समस्यांना केराची टोपली दाखवली. पाणी दूषित येत असून पाण्याला दुर्गंध येत असल्याची लोकांनी वारंवार तक्रार केली, तरी त्याकडे सरकारने कानाडोळा कसा काय केला? असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.