आता यूटीएस ऍपवरून लोकलचा पास बंद, प्रवाशांना ‘रेल वन’चा पर्याय वापरावा लागणार

उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या ‘यूटीएस ऍप’वरील मासिक पासची सुविधा कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाने अचानक ही सुविधा बंद केल्यामुळे प्रवाशांना यापुढे लोकल ट्रेनचा मासिक पास काढण्यासाठी ‘रेल वन’चा पर्याय वापरावा लागणार आहे. मात्र अनारक्षित तिकीट बुकिंगची सुविधा यूपीएस ऍपवर सुरूच राहणार आहे.

उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. बहुतांश प्रवासी तिकीट प्रणालीचे डिजिटलायझेशन झाल्यापासून मासिक पास काढण्यासाठी यूटीएस ऍपचा वापर करीत होते. रेल्वे प्रशासनाच्या नव्या धोरणानुसार, आतापर्यंत ज्यांचे मासिक पास वैध आहेत, ते प्रवासी तिकीट तपासनीस (टीसी) कर्मचाऱयांना यूटीएस ऍपवरचा पास दाखवू शकतात, मात्र नवीन मासिक पास बुक करण्याचा पर्याय कायमस्वरूपी हटवण्यात आल्यामुळे यापुढे प्रवाशांना लोकल ट्रेनचा मासिक पास काढण्यासाठी ‘रेल वन’ ऍपचा आधार घ्यावा लागणार आहे. या नवीन ऍपमध्ये आवश्यक ते तांत्रिक स्वरूपाचे बदल करून लोकलच्या प्रवाशांना सुविधा देण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने पाऊल उचलले आहे.

रेल वनवरून पास काढल्यास 3 टक्के सूट

रेल्वे प्रशासनाने डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी रेल वन ऍपद्वारे अनारक्षित तिकीट खरेदीवर तीन टक्के सूट जाहीर केली आहे. ही सवलत 14 जानेवारी ते 14 जुलै या सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहे. यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच इतर कोणत्याही डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करून मासिक पासचे पैसे भरणाऱया प्रवाशांना तिकीट खरेदीतील तीन टक्क्यांची सूट थेट मिळणार आहे.