
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नोव्हेंबर 2025 ची आकडेवारी जाहीर केली आहे. या महिन्यात व्होडाफोन-आयडियाला मोठा झटका बसला आहे. नोव्हेंबरमध्ये कंपनीने 10 लाखांहून अधिक मोबाईल ग्राहक गमावले आहेत. त्याच वेळी रिलायन्स जिओ, एअरटेल आणि सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल यांनी नवीन ग्राहक जोडण्यात यश मिळवले.
व्होडाफोन-आयडिया गेल्या अनेक महिन्यांपासून आर्थिक समस्या आणि 5जी रोलआऊटमधील विलंबामुळे ग्रासलेली आहे. ग्राहकांचा कल आता हाय-स्पीड डेटा आणि चांगल्या कव्हरेजकडे असल्याने अनेक युझर्स मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीद्वारे इतर कंपन्यांकडे वळत आहेत. व्होडाफोन-आयडियाने नोव्हेंबर महिन्यात 10 लाख 11 हजार 134 ग्राहक गमावले आहेत. त्यामुळे व्हीआयची एकूण ग्राहक संख्या घसरून 19.97 कोटी एवढी झाली आहे.
एअरटेल आणि जिओमध्ये चढाओढ
नोव्हेंबर महिन्यात रिलायन्स जिओने तब्बल 13.88 लाख नवीन ग्राहक मिळवत बाजारावर वर्चस्व सिद्ध केले आहे. जिओकडे आता 48.60 कोटी ग्राहक झाले आहेत. एअरटेलनेदेखील 12.15 लाख नवीन ग्राहक जोडले असून त्यांचा एकूण ग्राहक बेस आता 39.48 कोटींवर पोहोचला आहे.





























































