परीक्षण – सहजीवनाचा अनोखा प्रवास

>> तृप्ती कुलकर्णी  

दोन शहरांच्या नावांचा उल्लेख असलेलं पुस्तक सहजीवनाची सुंदर दास्तान मांडेल, असं सहसा वाटत नाही. मात्र डॉक्टर प्राची जावडेकर यांचं `पुणे दिल्ली पुणे’ हे पुस्तक या अपेक्षेला छेद देत एक वेगळाच अनुभव देतं. मराठी साहित्यात स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मकथनांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यातही राजकीय पार्श्वभूमी असलेली आत्मकथनं तर अगदी मोजकीच. त्या लेखनप्रवाहात प्राची जावडेकर यांचं हे आत्मकथन एक महत्त्वाची आणि मोलाची भर घालणारं ठरतं.

पुणे आणि दिल्ली ही दोन्ही शहरं आपलं स्वतंत्र अस्तित्व व वेगळा सांस्कृतिक दर्जा राखणारी आहेत. भाषा, संस्कृती, विचारपद्धती, राहणीमान आणि हवामान इ. सगळ्याच बाबतीत दोन्हींमधला फरक ठळकपणे जाणवतो. त्यामुळे हे शीर्षक कुतूहल निर्माण करतं. पुस्तक वाचल्यावर लक्षात येतं की, हे केवळ दोन शहरांचं वर्णन नसून दोन वेगळ्या जीवनपद्धतींमधील प्रवासाचं प्रतीक आहे.

या आत्मकथनाची सुरुवात 1975 च्या आणीबाणीच्या काळापासून होते. त्या काळात प्राचीजी आणि प्रकाश जावडेकर यांनी भोगलेला कारावास, त्यानंतरची सुटका, पुढे झालेला विवाह, प्रकाशजींची बँकेतली नोकरी, बढती, बदली आणि त्याचवेळी पक्ष कार्यकर्ता म्हणून होत गेलेली वैचारिक व सामाजिक जडणघडण, तेथून पूर्णवेळ राजकारणात प्रवेशापर्यंतचा प्रवास या पुस्तकात प्रभावीपणे उलगडत जातो. या प्रत्येक टप्प्यावर त्यांच्या प्रगल्भ सहजीवनाची वीण घट्ट होत असलेली दिसून येते.

या साऱया प्रवासात प्राचीजींनी कुटुंबाची आणि अर्थार्जनाची जबाबदारी पूर्ण ताकदीने पेललेली आहे. आणीबाणीच्या कारावासानंतर जिद्दीने शिक्षण पूर्ण करून त्याच शिक्षणाच्या बळावर पतीच्या राजकीय कारकीर्दीला भक्कम आधार देणं ही सोपी गोष्ट नाही. मात्र त्यांनी ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली, हे या आत्मकथनातून प्रकर्षाने दिसून येतं. या वाटचालीत त्यांना स्वतमध्ये अनेक बदल स्वीकारावे लागले. मध्यमवर्गीय पुणेरी मानसिकतेतून एका राजकीय पदाधिकाऱयाच्या पत्नीपर्यंतचा मानसिक प्रवास त्यांनी अत्यंत सहज, ओघवत्या शैलीत मांडला आहे.

प्रकाशजींना सहकार्य करता करता स्वतच्या मुलांची जडणघडण करणे आणि त्याचवेळी स्वतदेखील स्वतची सर्वार्थाने देखभाल करणे, कामात प्रगती करणे. वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांना तोंड देत विविध संस्थामध्ये उच्चपदस्थ कार्यभार सांभाळणं हेही त्यांनी साध्य केले. त्यांची ही घौडदौड वाचताना विशेष कौतुक वाटते. कुटुंबातल्या सर्वांच्या गरजांची पूर्तता करून आपल्या पतीला आधार देत स्वतलाही उभं करणं हे उत्तम शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता असल्याशिवाय शक्य नाही आणि एकूण 17 प्रकरणे असलेल्या या पुस्तकातून आपल्याला त्यांचं हे सामर्थ्य वेळोवेळी जाणवतं. मग अगदी घर लावण्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी बाजारहाट करण्यापर्यंत,  घरातील नोकरांना काही सवयी लावण्यापासून ते वेगवेगळ्या राजकीय पदाधिकाऱयांच्या पत्नींसाठी `कमल सखी’ मंचसारखा मंच तयार करण्याचं त्याचं कौशल्य बघून खरंच अचंबित व्हायला होतं. यातील `माझी उद्योजकता’ प्रकरणातून त्यांच्या कुशल नेतृत्वाचं आणि व्यवस्थापनाचं कौशल्य दिसतं. यामध्ये प्राचीजींच्या उद्योग निर्मितीच्या गोष्टी वाचून स्तिमित व्हायला होतं… जावडेकर एक्ज्युकेशरनल कन्सल्टन्सी लिमिटेड, परिघा रिसर्च कन्सल्टन्सी लिमिटेड, प्रोजेक्ट पद्मालय यांसारख्या प्रकल्पांमध्ये त्यांनी घेतलेली मेहनत, धडाडी दिसून येते. याच प्रकरणांमध्ये त्यांनी स्टार्टअप करणाऱयांसाठी उद्योजकता म्हणजे काय, त्याचा कसा विचार करायला हवा याबाबतीतही आपले अनुभवाचे बोल मांडलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये प्राचीजींमधली एक स्वयंपूर्ण उद्योजिका प्रभावीपणे समोर येते.

प्रत्येक प्रकरणागणिक प्राचीजींची विविध रूपं दिसतात… चोखंदळपणे बाजारहाट करणारी गृहिणी, मुलांना सर्वप्रकारे काम करण्याची सवय लावणारी जबाबदारीच भान देणारी आई, दिल्लीत आपल्या गप्पा मारायला घर हवं म्हणून मैत्रीसाठी आसुसलेली सखी दिसते आणि दिल्लीत राहूनही आपली संस्कृती व संस्कार जपणारी कुटुंबवत्सल पण करारी पत्नी. त्याचबरोबर पक्ष, देश आणि प्रकाशजींच्या कार्याबद्दल असलेली त्यांची आत्मीयताही ठळकपणे समोर येते. याची अर्पणपत्रिका यासाठीच बोलकं उदाहरण आहे. त्यामुळे हे आत्मकथन केवळ वैयक्तिक सहजीवनापुरतं मर्यादित न राहता, एका पक्षाचं, त्याच्या कार्यकर्त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचंही सहजीवन उलगडून दाखवणारं आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकदातरी ते आवर्जून वाचावं.

पुणे दिल्ली पुणे

लेखिका : प्राची जावडेकर

प्रकाशक : उन्मेष प्रकाशन

पृष्ठ : 208 ह मूल्य : 299 रुपये