
>> प्रा. आशुतोष पाटील
जगातील मानवी इतिहास समजून घेण्यासाठी महत्त्वाच्या अशा पाषाणयुगीन स्थळांमध्ये चंद्रपूर जिह्यातील पापामिया टेकडय़ांचा1 समावेश होतो. मात्र दिवसेंदिवस या पुरातत्त्वीय स्थळाचे नुकसान होत असून आता केवळ 4 एकर जागा सुरक्षित आहे. शासनाच्या अनास्थेमुळे अमूल्य वारसा आज गंभीर धोक्यात आलेला आहे.
मानवी उपांतीच्या लाखो वर्षांच्या काळात माणसाने या पृथ्वीवर अनेक ठिकाणी आपल्या वस्त्या केल्या. त्या कधी नदीकाठी, कधी कुठल्या गुहांमध्ये तर कधी निवारा तयार करून त्यात तो राहू लागला. भारतामधील प्राचीन पाषाणयुगीन संस्कृती प्रथमच प्रकाशात आल्या, त्या 1863 साली रॉबर्ट ब्रूस फूट यांनी चेन्नई (तेव्हाचे मद्रास) जवळील पल्लावरम् येथे शोधलेल्या एका हातकुऱहाडीच्या (हँड-अॅक्स) महत्त्वपूर्ण शोधामुळे. त्यानंतर देशभर विविध अभ्यासक, मोहिमा, संस्था आणि विद्यापीठांनी व्यापक संशोधन व उत्खनने केली. आज भारताच्या जवळजवळ प्रत्येक भागातून प्रारंभिक पाषाणयुगीन स्थळे नोंदवली गेली आहेत. अश्मयुगीन माणसाने भारतातील अतिरंपक्कम, डिडवाना, हुंसगी खोरे, ज्वालापूरम, बागोर अशा अनेक ठिकाणी निवास केला. राज्यांच्या विविध भागांत आढळणारी पाषाणयुगीन स्थळे ही भारतातीलच नव्हे तर जगातील मानवी इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठिकाणे आहेत.
?या प्रवासात तो आताच्या महाराष्ट्रातील काही ठिकाणी राहिला त्यात नेवासा, बोरी, पाटणे या ठिकाणांचा समावेश तर होतोच, पण यासोबतच अजून एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे चंद्रपूर जिह्यात असलेली `पापामिया टेकडी’. ही टेकडी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण उपखंडातील एक अत्यंत महत्त्वाचे पुरातत्त्वीय स्थळ मानले जाते. हा भूभाग इतका प्राचीन आहे की, इथे असलेल्या पिसदुरा जागी डायनासोरच्या अंडय़ाचे अवशेषदेखील सापडलेले आहेत.
पाषाणयुग हा मानवी संस्कृतीचा सर्वात प्राचीन टप्पा मानला जातो. या काळात मानवाने दगडापासून साधने तयार करणे, शिकार करणे, अन्नसंग्रह करणे आणि समूहात राहण्याची प्राथमिक सामाजिक रचना विकसित केली. महाराष्ट्रातील अनेक स्थळांवर सापडलेली ही साधने आणि अवशेष मानवाच्या बौद्धिक विकासाची आणि तांत्रिक कौशल्याची झलक दाखवतात. त्यामुळे ही ठिकाणे केवळ अवशेष नसून, मानवी उपांतीचे जिवंत दस्तऐवज आहेत. आणि याचीच साक्ष आहे चंद्रपूर जिह्यात असलेली `पापामिया टेकडी’ जिथे साधारण 1,50,000 वर्षांपूर्वीपासूनचे दगडी हत्यार सापडतात.
इ.स. 1960-61 साली भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Aएघ्) संस्थेच्या दक्षिण-पूर्व विभागातील एल. के. श्रीनिवासन यांनी या स्थळाचा पहिला शास्त्राrय शोध लावला. त्यांना या ठिकाणी पुराश्मयुगीन हत्यारं सापडली. त्यानंतर डॉ. एस. एन. रघुनाथ आणि डॉ. एस. बी. ओटा यांनी केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले की, वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांच्या मधल्या भौगोलिक स्थानामुळे हे ठिकाण प्राचीन मानवासाठी अत्यंत अनुकूल होते आणि त्यामुळेच येथे अश्मयुगीन मानवाची वस्ती झाली.
येथे सापडलेली दगडी साधने प्रामुख्याने निम्न, मध्यम आणि नव पाषाणयुग या तिन्ही टप्प्यांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये अॅशुलियन आणि ओल्डोवन प्रकारातील हातकुऱहाडी, क्लीव्हर्स, चॉपर, पॅपर, बोअरर, ब्लेड्स, बुरिन्स आणि हातोडे यांचा समावेश आहे. ही साधने प्रामुख्याने तपकिरी, पिवळ्या व लाल रंगाच्या चर्ट (म्पू) दगडापासून बनवलेली आहेत. याशिवाय, काही स्तरांमध्ये सूक्ष्म दगडी हत्यारे (स्ग्म्rदत्ग्tप्s) देखील आढळली आहेत, जी साधारणत इ.स.पू. 10,000 ते 30,000 या काळातील मानली जातात. याच परिसरात अॅगेट दगडापासून बनवलेला फ्लेकदेखील सापडला आहे जो की इतर ठिकाणी क्वचित आढळतो. सुमारे 12 ते 15 एकर क्षेत्रफळात पसरलेली पापामिया टेकडी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा आणि महत्त्वाच्या पाषाणयुगीन स्थळांपैकी एक आहे. येथे सापडलेले पुरावे इ.स.पू. 30,000 ते 1,50,000 वर्षांपूर्वीच्या काळातील असल्याचे मानले जाते.
हे स्थळ दक्षिण आशियाच्या संदर्भाच्या व्यापक चौकटीत महाराष्ट्रातील पुरापाषाण काळातील संस्कृती आणि जीवनशैली समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय उपखंडातील निम्न पुरापाषाण काळ प्रामुख्याने अशुलियन दगडी तंत्रज्ञानाशी संबंधित असला तरी दक्षिण आशियामध्ये या संस्कृतीचा स्वतंत्र विकासमार्ग दिसून येतो. इसमपूर आणि अत्तिरमपक्कमसारख्या स्थळांवरून मिळालेल्या प्राचीन तारखा आणि भौतिक वैशिष्टय़े हे अधोरेखित करतात की येथील पाषाणयुगीन संस्कृती केवळ बाह्य प्रभावांची नक्कल नव्हती, तर ती स्थानिक परिस्थितींशी जुळवून विकसित झाली होती. पापामिया टेकडी हे स्थळ नदीप्रणालीशी संबंधित असल्याने, येथे साचलेल्या गाळाचे स्वरूप, त्यानंतर झालेले नैसर्गिक बदल आणि मानवी वस्तीवर त्यांचा झालेला परिणाम यांचा अभ्यास करण्यासाठी भू-पुरातत्त्वीय दृष्टीनेही हे ठिकाण अत्यंत उपयुक्त ठरते. पूर्व महाराष्ट्रात अशा प्रकारची पुरापाषाणकालीन स्थळे फारच दुर्मिळ आहेत. आपल्या पूर्वजांनी कोणत्या परिस्थितीत जीवन जगले आणि त्यांनी पाषाणयुगीन संस्कृती कशा घडवल्या हे समजून घेण्यासाठी अधिक शास्त्राrय उत्खनन आणि अचूक कालमापनाची नितांत गरज आहे. त्या दृष्टीने पापमिया की टेकडी हे स्थळ तातडीने अभ्यासासाठी घेणे अत्यावश्यक आणि अत्यंत मोलाचे आहे. या स्थळाचे अभ्यासक अमित भगत यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसेंदिवस या स्थळाचे नुकसान होत असून आता केवळ 4 एकर जागा सुरक्षित आहे, शासनाचे दुर्लक्ष आणि पोकळ आश्वासनांमुळे या स्थळावर नियोजित संग्रहालय उभे राहिलेले नाही. याचे जतन न झाल्यास आपण महत्त्वाचा वारसा गमावून बसणार आहोत.
आपला वारसा हा थेट अश्मयुगीन काळापर्यंत पोहोचतो, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, मात्र हा अमूल्य वारसा आज गंभीर धोक्यात आलेला आहे. अश्मयुगापासून मानवाने केलेला दीर्घ आणि अद्भुत प्रवास हा आपल्या अभ्यासाचा अविभाज्य भाग आहे; पण हा इतिहास केवळ पुस्तकांपुरता मर्यादित राहून चालणार नाही. तो वारसा संरक्षित केला गेला पाहिजे, जपला गेला पाहिजे आणि पुढील पिढय़ांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे.
(लेखक पुरातत्व अभ्यासक असून एमजीएम विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.)

























































