
>> अक्षय मोटेगावकर ([email protected])
प्रेक्षकांचे आणि श्रोत्यांचे `लल्लनटॉप’ मनोरंजन करणारे सौरभ द्विवेदी आणि त्यांचे `लल्लनटॉप’ यूटय़ूब चॅनेल कायम रसिकांच्या पसंतीच्या यादीत पहिल्या क्रमांकात असते.
यूटय़ूबवर एक मुलाखत आली आणि एका रात्रीत आपली मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक ही नॅशनलक्रश झाली. ती मुलाखत घेतली होती सौरभ द्विवेदीने आणि ते चॅनेल होते `द लल्लनटॉप.’ `गेस्ट इन द न्यूजरूम’मधील मुलाखत असो, राजकारणातील रणधुमाळीवरच्या मोठमोठय़ा `ग्राऊंड रिपोर्ट’ चर्चा असो, गिरीजा ओकने जी केली ती मुलाखतीची `घर जैसी बाते’ ही शृंखला असो, `दुनियादारी’ किंवा `नेतागिरी’ असो, अर्थसंकल्प विस्कटून सांगणारे `बजेट’ असो वा `लल्लनटॉप अड्डा’ असो, लल्लनटॉप प्रेक्षकांचे आणि श्रोत्यांचे `लल्लनटॉप’ मनोरंजन करते हे नक्की. तसं पाहिलं तर अगदी गमतीशीर नावाचे हे यूटय़ूब चॅनेल. लल्लनटॉप म्हणजे हिंदी भाषिक लोकांमध्ये बोलीभाषेत प्रचलित असणारी `बेस्ट’ गोष्ट. काही ठिकाणी लल्लनटॉप हे लंडन टॉप (लंडनसारखे टॉप) याचा अपभ्रंश आहे असे पण वाचायला मिळाले. जे असेल ते असेल हे चॅनेल मात्र भारी आहे. इंडिया टुडे या ग्रुपचा भाग असला तरी या चॅनेलने स्वतचा वेगळा असा चाहता वर्ग तयार केला आहे.
सौरभ द्विवेदी हा या चॅनेलचा संस्थापक संपादक. उरई या उत्तर प्रदेशातील छोटय़ाशा भागातून येणाऱया सौरभने जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयातून हिंदीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि हिंदी साहित्यात एम.फिल. केले आणि त्यानंतर इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशनमधून मास कम्युनिकेशनचा अभ्यापाम पूर्ण केला. `नव भारत टाईम्स’ त्यानंतर दैनिक `भास्कर’पासूनचा सौरभचा प्रवास इंडिया टुडे ग्रुपमध्ये स्थिरावला आणि त्याने `द लल्लनटॉप’ नावाचे चॅनेल सुरू केले. उरई हा भाग कानपूर आणि झाँसी या दोहोंच्या मधला त्यामुळे सौरभवर हिंदी भाषेचे संस्कार लहानपणापासूनच झाले. त्यातच एम. ए., एम. फिल. हिंदी साहित्यात त्यामुळे हिंदी साहित्य व जागतिक साहित्यातील रुची तयार झाली आणि मग सुरू झाला लल्लनटॉपचा प्रवास.
लल्लनटॉप या यूटय़ूब चॅनेलवरची पाहिलेली किंवा ऐकलेली पहिली मुलाखत कोणती हे निश्चितपणे सांगता येणार नाही, पण कदाचित कॉमेडियन झाकीर खान, डॉ. कुमार विश्वास, मनोज वाजपेयी किंवा विकास दिव्यकीर्ती यांच्यापैकी कोणाची तरी असावी हे नक्की. या सगळ्याच मुलाखती छान आहेत. गेस्ट इन द न्यूजरूममध्ये बऱयापैकी चित्रपट कलाकार, डॉक्टर्स, गायक, वकील, जज, कलाकार अशी मंडळी जास्त आली. त्यापैकी आदिल हुसेन, पंकज त्रिपाठी, दिव्या दत्ता, आशुतोष राणा, राजपाल यादव, विशाल भारद्वाज, इम्तिआज अली यांच्या मुलाखती छान झाल्या. सौरभ द्विवेदीची सर्वात छान गोष्ट म्हणजे ते ज्या पद्धतीने पाहुण्यांची ओळख करून देतात- पल्लेदार वाक्य, खास अशी विशेषणं, `कनेक्टिंग द डॉट्स’ म्हटल्यासारखं ते पाहुण्याच्या कार्याचा आणि एका मोठय़ा उद्दिष्टाचा धागा जुळवतात ते कौतुकास्पद आहे.
सौरभ सगळ्या मुलाखती या गुडी गुडी स्वरूपाच्या ठेवत नाही. काही विवादास्पद मुद्दय़ांना स्पर्श करत ते त्यामागचे सत्य जनतेसमोर आणायचा प्रयत्न करतात. डॉ. कुमार विश्वासबरोबर बोलताना आम आदमी पार्टीबरोबर मतभेद का आणि कसे झाले इथपासून ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश वाय सी चंद्रचूड, रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते बेझवाडा विल्सन यांना पण बोलतं करतात. निवडणुकीच्या काळात लल्लनटॉपची टीम केंद्रातील किंवा राज्यातील विविध मुद्दय़ांवर रान माजवते. खळबळजनक बातमीच्या मागचे सत्य एखाद्या स्पेशल बुलेटिनद्वारे जनतेसमोर आणायचा प्रयत्न करते.
लल्लनटॉपचे अजून दोन पॉडकास्ट पण फार छान आहेत. किताबवाला आणि बैठकी. अगदी जरूर पाहावे आणि ऐकावे. त्यापैकी किताबवालामधील युअल नोआह हरारीची मुलाखत आवर्जून ऐकावी. सगळ्यांना सगळेच आवडेल, रुचेल असे नाही किंबहुना असे नसावेसुद्धा, पण यातून बहुश्रुतता येते, कानांची आणि मेंदूची मशागत होते, भल्या बुऱयाची जाण वाढते, विचारांच्या कक्षा रुंदावतात हे नक्की. नवे वर्ष खूप चांगलं चांगलं ऐकण्याचं आणि भल्या बुऱ्याची जाण वाढवणारे ठरो याच सदिच्छा!
(लेखक कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून मुक्त लेखक आहेत.)


























































